प्रदूषण मंडळाकडून परवाना नूतनीकरणासाठी नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:59 AM2018-12-28T04:59:54+5:302018-12-28T05:00:04+5:30
महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दासगाव : महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये हॉटेल, दगडखाणी, आणि घनकचरा वाहतूकदार यांचा समावेश आहे. देण्यात आलेले वेळेत परवाने नूतनीकरण न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल व्यावसायिक, स्टोन क्रशर, आणि घनकचरा वाहतूकदार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियामानुसार परवाने घेणे बंधनकारक आहे. महाड तालुक्यातील अशा परवानाधारकांची मुदत संपल्याने हे परवाने नूतनीकरण करणे आवश्यक आहे. हॉटेलमधील सांडपाणी व्यवस्थापन, स्टोन क्रशरवरील धुळीचे नियोजन, आणि घनकचरा वाहतूक करत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक असते. याकरिता परवाने दिले जातात. हे परवाने नूतनीकरण करून घेण्याकरिता या नोटिसा बजावल्या आहेत. महाडमध्ये १३ घनकचरा वाहतूकदार, ४८ हॉटेल व्यावसायिक, ३७ स्टोन क्रशर एवढ्या व्यावसायिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दिलेल्या मुदतीत हे नूतनीकरण करून घेणे आहे. मात्र, व्यावसायिकांनी नूतनीकरण न करून घेतल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. पर्यावरण संरक्षण कायदा, जलप्रदूषण कायदा, आणि वायुप्रदूषण कायद्याप्रमाणे ही कारवाई केली जाणार आहे.
महाड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, स्टोन क्रशर, आणि घनकचरा वाहतूकदार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात येणारे परवाने नूतनीकरण करून घेणे जसे बंधनकारक आहे, तसे परवाना नियमांचे पालन देखील करणे आवश्यक आहे.
- प्रकाश ताटे,
क्षेत्र अधिकारी, प्रदूषण मंडळ