माथेरान : माथेरान पर्यटन नगरीचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची मिनीट्रेन बंद होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला असून मिनीट्रेन बंद झाल्याने त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायावर बसला आहे. दिवसेंदिवस येथे येणाºया पर्यटकांमध्ये घट होत असून माथेरानकरांसाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच स्वाभिमान पक्ष संयुक्तपणे पुढे सरसावले असून त्यांनी मुंबई येथे जाऊन रेल्वेचे डी. आर. एम. संजयकुमार जैन यांची भेट घेऊन मिनीट्रेन सुरू होण्याबाबत चौकशी करण्याची मागणी के ली. जर या महिन्यात रेल्वे सुरू झाली नाही तर नेरळ येथे १ नोव्हेंबरला रेल रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले.रेल्वे बोर्डाकडून मागील एक वर्षापासून मिनीट्रेन सुरू होण्याच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या, पण ही फक्त वेगवेगळी आश्वासनेच असल्याचे सिद्ध होत होते. माथेरानमधील अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी रेल्वे सुरू होण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे, पण रेल्वे अधिकाºयांची ही सेवा सुरू करण्याची मन:स्थितीच नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. देशात मागील काही दिवसांमध्ये अनेक वेळा अपघात झालेत मात्र या सेवा पूर्ववत करण्यात आल्या. मात्र माथेरान मिनीट्रेन याला अपवाद ठरलेली आहे. रेल्वे कर्मचाºयांच्या चुकांमुळे या गाडीला किरकोळ अपघात झाला होता. पण दोषींवर कारवाई करण्याऐवजी ही मिनीट्रेन बंद करण्याचा अजब निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता. वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वेचे सकारात्मक पाऊल पडत नसल्याने याचा विपरीत परिणाम येथील पर्यटनावर पडत असल्याने सर्वसामान्य घोडा, रिक्षाचालक, कुली, व्यावसायिक उपासमारीमुळे हवालदिल झालेआहेत.नेरळ-माथेरान मार्गावर आताही रोज मालवाहू गाडी माथेरानला येते. मात्र तरीही रेल्वे प्रशासन सुरक्षेचे कारण देऊन ही सेवा पूर्ववत करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच १ नोव्हेंबर रोजी रेल रोको करण्याचा निर्णय राष्ट्रवादी. राष्ट्रीय काँग्रेस तसेच स्वाभिमान पक्षाने घेतला.नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सर्व रेल्वे अधिकाºयांना तातडीने बोलावून माथेरानच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी काही सुरक्षिततेचे सर्व मुद्दे तपासून लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे डी. आर. एम. संजयकुमार जैन यांनी स्पष्ट केले.
१ नोव्हेंबरला रेल रोको, नेरळ स्थानकात माथेरानकर करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:23 AM