अलिबाग : पावसाने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पेणमध्ये आलेल्या पुराने हजारो नागरिकांचे प्राण गळ्याशी आले होते. एनडीआरएफच्या मदतीने बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीसाठी सोमवारी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. पुरामध्ये घरांचे, गोठ्यांचे, शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पडलेल्या दरडीही बाजूला करण्यात आल्या आहेत.गेल्या तीन दिवसांपासून अखंडित बरसणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. सतत पडणाºया पावसामुळे नद्यांचे पाणी थेट नागरी वस्त्यांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचे आतोनात नुकसान झाले. याच पुराच्या पाण्यामध्ये हजारो नागरिक अडकून पडले होते. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफची टीम रविवारी पहाटे पेण तालुक्यात हजर झाली होती. त्यांनी बचाव कार्य सुरू करून कणे येथील सुमारे ६०० नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले होते. अलिबाग, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, रोहा आणि कर्जत या ठिकाणी पुराचा कहर मोठ्या प्रमाणात होता. त्याचप्रमाणे मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात रविवारी हटवलेला मलबा सोमवारी युद्धपातळीवर मार्गातून दूर करण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये पोलादपूर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर पडलेली दरड आणि पेण-दुष्मी तसेच रोहा तालुक्यातील रेल्वे ट्रॅकवरील दरडीचा समावेश आहे. सध्या या मार्गावरून आता सुरळीत वाहतूक सुरू आहे.ठिकठिकाणी राज्यमार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यामध्ये उन्मळून पडलेले वृक्ष तोडण्याचे काम सोमवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे धिम्या गतीने सुरू असलेली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने उद्भवणाºया आपत्तीच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. भारतीय लष्करातील सुमारे ५५ जवान हे पेण तालुक्यात दाखल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या आपत्तीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पेण तालुक्यातील अंतोरे येथील रेसक्यू केलेल्या ६६ नागरिकांमधील वयावृद्ध, महिला, गरोदर माता, लहान मुले यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्याची व पांघरुणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा आणि मदतीसाठी भारतीय लष्कर अलर्ट मोडवररायगड जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षितता आणि मदतीसाठी आलेले भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. पुणे येथून ५५ जणांची टीम पेण येथे दाखल झाली आहे. कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली तर तातडीने तेथे मदत आणि बचाव कार्यासाठी तत्पर राहणार आहे. पेण शहरातील हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.१०५१ नागरिकांना के ले स्थलांतरितअलिबाग तालुक्यातील बोरघर गावातील १७५ व खानावमधील ९३ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पेण तालुक्यातील अंतोरे ६६, कणे ९०, वाशी ५०, शिर्की ७०, माणगाव- चिंचवली सोन्याची वाडी ६३, रोहे-नागोठणे ५०, सुधागड- चिवे खुरवले फाटा २५, पनवेल-कातकरीवाडी ७५, खालापूर-बोरगाव ताडवाडी-२५३, आचरे फार्म हाउसमधील ३५ पर्यटक अशा एकूण १०५१ नागरिकांना रविवारी आणि सोमवारी रेसक्यू करून सुखरूप काढण्यात आले आहे.
पावसानंतर आता नुकसानीचा सामना; महसूल प्रशासनाकडून पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:49 PM