रायगड : सर्वसामान्यांना सुखकारक जीवन जगता येईल, अशी काेणतीही ठाेस पावले केंद्र सरकारने बजेटमध्ये उचललेली नाहीत. खाद्यतेलांच्या किमतीत २०२०च्या तुलनेत तब्बल ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी तेल खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्राॅल कंट्राेलमध्ये राहील. नागरिकांच्या आराेग्यासाठी हे चांगलेच आहे, असा सल्ला माेदी सरकार तेलाच्या किमतीवरुन द्यायला विसरणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत.सरकारने पेट्राेल-डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. किराणा सामानाबराेबरच भाजीपाला, फळे व अन्य आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्यांचे बजेट खिळखिळे झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. पालेभाज्यांच्या किमती वाढलेल्या असतानाच जेवणामध्ये आवश्यक असणारा प्रमुख घटक म्हणजे खाद्यतेल म्हणजेच गाेडतेलाच्या किमतीही सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे तेलाची फाेडणी देताना गृहिणी हात आखडता घेत आहेत. मसालाही महागला आहे, गॅसही महागला आहे. त्यातच आता खाद्यतेलांच्या किमतीही वाढल्याने अर्थकारण बिघडले आहे. एक लीटर करडईचे तेल १२० रुपयांना बाजारात मिळत आहे, तर सूर्यफुल १६५ रुपये लीटर, शेंगदाणा तेल १८० रुपये लीटर, साेयाबीन तेल १०० रुपये लीटर आणि सरकीचे तेल १४० रुपये लीटरने बाजारात मिळत आहे. प्रत्येक तेलाच्या दरात १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न आता त्यांच्यामधून विचारला जात आहे. कशामुळे झाली वाढ? केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये पेट्राेल-डिझेलच्या किमतीमध्ये काेणतीही सूट दिलेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. मार्चमध्ये खाद्यतेलांच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. प्रत्येक खाद्यतेलामध्ये १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गृहिणींच्या प्रतिक्रिया आम्हाला वाटले हाेते की, माेदी सरकार बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देईल, मात्र घाेर निराशा केली आहे. खाद्यतेलांच्या किमती तब्बल ४० रुपयांनी वाढल्या आहेत. तेलामुळे काेलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढते. तेलाच्या किमती वाढल्याने नागरिक कमी तेल खातील आणि कमी तेल शरिरात गेल्याने त्यांचे आराेग्य सुदृढ राहील, असे सांगायलाही सरकार कमी पडणार नाही.- सुषमा पाटील, गृहिणी सरकारने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ठेवल्या आहेत. त्यामध्ये कडधान्ये, भाजीपाला, गॅस सिलिंडरसह खाद्यतेलाचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे. एकदा करण्यात आलेली दरवाढ कमी केली जात नाही आणि केलीच तर ती काही पैशांमध्ये असते.- मीनाक्षी पाटील, गृहिणी खाद्यतेलांच्या किमती या गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान ४० रुपयांनी वाढल्या आहेत. बाजारात अशी काेणतीही वस्तू नसेल ज्याची किमत वाढलेली नाही. महागाई वाढली मात्र महिन्याचे उत्पन्न पूर्वीइतकेच आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न आहे. आता स्वयंपाक करताना तेल जरा जपूनच वापरावे लागणार आहे.- दीपाली म्हात्रे, गृहिणीपेट्राेल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे तेल आयात केले जाते. सध्या मागणी वाढली आहे आणि मालही उपलब्ध हाेत नाही.- अशोक अग्रवाल, व्यापारी
आता सरकार म्हणेल, तेल कमी खा, कोलेस्ट्राॅल कमी करा; वाढत्या खाद्य तेलांच्या किमतीवरून संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:00 AM