भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आता जिल्हा परिषदेचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:06 PM2024-03-28T12:06:29+5:302024-03-28T12:06:39+5:30
२५ लाखांच्या निधीची तरतूद; अलिबाग तालुक्यात सुरुवात
अलिबाग : मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरू लागले होते. यावर ठोस उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील चेंढरे, थळ व चौलमधील २०७ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करण्यात आले. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. काही वेळा दुचाकीवरून प्रवास करीत असताना कुत्रे अंगावर आल्याने अपघात होण्याची भीतीदेखील असते. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना, विशेष करून लहान मुलांना दहशतीच्या खाली राहावे लागत आहे.
जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील चार हजार १७६ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. यामध्ये एक हजार २०४ जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. तर, दोन हजार ९७२ जणांवर बाह्य रुग्ण कक्षात उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण हा उपक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुणे येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. २५ फेब्रुवारीपासून या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी पेणमध्ये एक सेंटर उभारण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांना त्या सेंटरमध्ये आणणे आदी कामे सुरू आहेत.
मोहीम सुरू...
ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला अलिबाग तालुक्यातील चेंढरे, चौल व थळ ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आतापर्यंत २०७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.
अलिबाग शहरात उपाययोजना
अलिबाग शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पादचाऱ्यांसह दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा त्रास अनेक वेळा झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, अलिबाग नगर परिषदेमार्फत देखील उपाययोजना करण्यात आली नव्हती. कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी पाच वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पुन्हा निविदा मागविण्यात आली होती. पुणे येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे यांनी दिली.