अलिबाग : स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणाऱ्या एकत्रित निवृत्तिवेतनाची माहिती उपलब्ध होत नव्हती. यावर उपाययोजना म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तिवेतन आता जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत (ट्रेझरी) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील १०६ स्वातंत्र्य सैनिकांना मिळणार आहे. राज्यामध्ये १९६५ पासून स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तिवेतन योजना राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्य सैनिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवृत्तिवेतन अदा केले जात होते. २२ जुलै १९८६ च्या शासन निर्णयानुसार निवृत्तिवेतनधारकांना बँकांमार्फत निवृत्तिवेतन घेण्याचा पर्याय दिला होता. स्वातंत्र्य सैनिक निवृत्तिवेतनावर झालेल्या खर्चाची माहिती बँका वेळेवर सरकारला देत नव्हत्या, त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तिवेतनावर किती खर्च केला जातो याची एकत्रित आकडेवारी सरकारला प्राप्त होत नव्हती. खर्चाचे नियोजन करण्याबरोबरच वित्तीय, प्रशासकीय अडचणीत वाढ झाली होती. यावर उपाय म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तिवेतन आता कोषागार कार्यालयामार्फत स्वातंत्र्य सैनिकांची खाती ज्या बँकांमध्ये आहेत त्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. सरकारच्या निर्णयाचा लाभ रायगड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनाही मिळणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. रायगड जिल्ह्यामध्ये राज्य सरकारकडे नोंदलेले ७२ लाभार्थी असून त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रति महिना निवृत्तिवेतन देण्यात येते. ३४ स्वातंत्र्य सैनिक केंद्र सरकारकडे नोंदविलेले असून त्यांना केंद्राकडून २० हजार रुपये शिवाय राज्य सरकारकडून ५०० रुपये प्रति महिना निवृत्तिवेतन देण्यात येते. (प्रतिनिधी)
आता ट्रेझरीमार्फत सैनिकांना पेंशन
By admin | Published: November 17, 2015 12:31 AM