माथेरानची संपूर्ण माहिती मिळणार आता एका क्लिकवर; पर्यटन विषयक अॅप लवकरच होणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 01:40 AM2020-12-04T01:40:53+5:302020-12-04T01:41:17+5:30
या अॅपमध्ये पर्यटकांना माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडे, हातरिक्षा, कुली आदींची सर्व माहिती असणार आहे. यात दरांचाही समावेश असेल.
कर्जत : माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीकरिता एक अॅप तयार करण्यात येत असून याच महिन्यात त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून बहुपर्यायी अशा या अॅपची निर्मिती केली जात आहे.
निसर्गरम्य प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालते. २४०० फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने या ठिकाणी प्रदूषणाचा लवलेश नाही. ५४ चौरस किलोमीटरवर माथेरान पसरले असून, यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानची ओळख व माहिती डिजिटल स्वरूपातही असावी यासाठी एक अॅप बनविले जात आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना पॉइंट्स, हॉटेल - रेस्टॉरंट, वन्यजीव याची इत्थंभूत माहिती यातून मिळेल तसेच दस्तुरी नाका येथे होणारी त्यांची फसवणूक थांबावी या दृष्टीनेही अॅप उपयुक्त ठरू शकते.
याशिवाय या अॅपमध्ये पर्यटकांना माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडे, हातरिक्षा, कुली आदींची सर्व माहिती असणार आहे. यात दरांचाही समावेश असेल. माथेरानच्या दस्तुरी नाका येथे एन्ट्री तिकीट घेतल्यानंतर वायफायच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅनद्वारे हे अॅप डाऊनलोड करता येईल तसेच गुगल आणि अॅपलच्या प्ले स्टोअरवरूनही ते उपलब्ध असणार आहे. अनलॉकनंतर नागरिक फिरायला जाण्यासाठी चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणांच्या शोधात आहेत. या ॲपमुळे त्यांना माथेरानमधील योग्य निवासी जागांची माहिती मिळणार असल्याने स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे.