अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : राज्यात अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यानुसार रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी परिवहन, वाहतूक आणि जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या, तसेच त्यांच्याकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण घटले आहेच. तसेच मृत्यू आणि जखमींची संख्याही कमी झाली आहे. याबद्दल जिल्हा प्रशासनाचे राज्य शासनाकडून कौतुक करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो, त्याचबरोबर पनवेल या जिल्ह्यातील प्रवेशद्वारावरून पनवेल-सायन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, राष्ट्रीय महामार्ग ४ बी आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जातो, त्याशिवाय येथे अनेक राज्यमार्गही आहेत. रायगड जिल्ह्यात जेएनपीटी, स्टील मार्के ट, तळोजा, पाताळगंगा, नागोठणे, महाड येथे एमआयडीसी आहे, तसेच रायगड समुद्रकिनाराही आहे. वेगवेगळे आंतरराष्ट्रीय प्रकल्प येथे येऊ घातले आहेत. झपाट्याने नागरीकरणात वाढ होत आहे. आता तर सिडको थेट अलिबागच्या पुढे पोहोचली आहे. या सर्व गोष्टींमुळे जिल्ह्यात वाहनांची रहदारी वाढू लागली आहे. त्यातच रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नसल्याने मोठ्या संख्येने अपघात होतात. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गावर कित्येक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्या ठिकाणीही वाहनांचे भीषण अपघात घडतात. यामध्ये शेकडो जणांचा प्राण जातो, तसेच कित्येक जण जखमीसुद्धा होतात. काहींना अपंगत्व येते त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो.
रस्ते अपघातात देशात आणि राज्यात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडतात. मृत्यू आणि जखमी होणाऱ्या अपघातग्रस्तांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे. त्यामुळे शासनाने अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या एक-दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. दंडाच्या रकमाही वाढवण्यात आल्या आहेत. केवळ कायदेशीर कारवाई न करता वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधनही केले जात आहे. त्यासाठी महिनाभर रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्था, व्यक्ती तसेच वाहनचालक, वाहतूकदार यांना सामावून घेतले जात आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती केली जात आहे.जिल्ह्यात अपघाती मृत्यूच्या संख्येत २० टक्क्यांनी घटजिल्ह्यामध्ये अपघातांच्या संख्येत वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबिल्या जात आहेत, त्यामुळेच अपघाताची संख्य १० टक्क्यांनी आणि अपघातात मृत्युमुखी पडणाºयांच्या संख्येमध्ये २० टक्क्यांनी घटली आहे. तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पाच वाहतूकदूत नेमण्यात यावेत, असा सल्लाही रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिला.३१ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. अलिबाग येथील मुरुड-जंजिरा सभागृहात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या अपघातांच्या मालिकांमध्ये वाढ झाली आहे, ही वाढ थांबविण्यासाठी सध्या वाहतूक विभागामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सफल झाल्याचे दिसून येते.महविद्यालयातील तसेच सर्वच तरु णांनी गाडी चालविताना सामाजिक भान जपणे गरजेचे आहे, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. सध्या अल्पवयीन मुले महाविद्यालयात येण्यासाठी आपल्या पालकांकडे मोटारसायकलचा अग्रह धरत आहेत. पालकही त्यांचा हट्ट पुरवत असल्याचे दिसून येते, त्यामुळे मुलांमध्ये बळावणाºया बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठीआता वाहतूक विभागाने कंबर कसली आहे.महाविद्यालयीन तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून पाच वाहतूकदूत नेमण्यात यावेत, असा सल्ला डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांना दिला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार आदी उपस्थित होते.उपप्रादेशिक कार्यालयाकडून प्रबोधनरायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात याबाबत परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल आणि पेण उपप्रादेशिक कार्यालयाकडून प्रबोधन करण्यात आले. चालकांचे ठिकठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच माहितीपर वर्ग आयोजित करण्यात आले. यासाठी महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. अनेक ठिकाणी रॅली काढून वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. याशिवाय रायगड आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडूनही अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त संजय कुमार, वाहतूक विभागाचे उपायुक्त सुनील लोखंडे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह इतर अधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.विविध प्रकारच्या कारवार्इंत यश1. जिल्ह्यातील होणाºया अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेमार्फत विशेष परिश्रम घेतले जात आहेत. विनाहेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे, त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.2. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह तापासणी, महामार्गावर चारचाकी वाहनांचा वेग तपासणे, सिटबेल्ट न लावणाºया चालकांवर कारवाई यासह वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवरही कारवाई करण्यात आली आहे.3. अशा विविध उपायांमुळेच सध्या अपघातांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.4. तसेच कुटुंबातील व्यक्ती बाहेर पडताना त्याने हेल्मेट व सिट बेल्ट लावूनच बाहेर पडावे, असा सल्ला आणि विनंती घरातील व्यक्तींनीच करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.