रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन खुला झाल्यावर वाढले अपघातांचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 11:34 AM2020-10-24T11:34:50+5:302020-10-24T11:35:29+5:30
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे.
निखिल म्हात्रे
अलिबाग: बेपत्ता वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने, यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला २ ते ३ अपघात होत आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीत ९९१ अपघात झाले असून, यामध्ये २१६ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुणा महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग आहेत. या व्यतिरिक्त विविध महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे. तेथे सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सुरू आहे.
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलिस दूरक्षेत्र हद्दीत रस्ते अपघात प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण झाले असले तरी, अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ९९१ रस्ते अपघात झाले असून, यामध्ये २१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची मुख्य कारणे
- महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
- रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने, तसेच धोकादायक वळणांवर ताबा न राहणे.
- रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
- कोणतीही पूर्वकल्पना न देता, वाहन दुसऱ्या बाजूला नेणे, मद्य पिऊन वाहन चालविणे.