- जयंत धुळप, अलिबागराज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या नियोजनानुसार, रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून जनजागृती, सातत्यपूर्ण तपासणी कार्यक्रम, सत्वर उपचार संदर्भ सेवा यामुळे रायगड जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले आहे. २०००मध्ये हे प्रमाण ४२ टक्के होते, ते २०१६अखेरीस १.५ टक्क्यांवर आणण्यात यश आल्याची माहिती रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रणाच्या (डापकू) माध्यमातून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ७१ हजार ९० संशयित रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये ०.५७ टक्के म्हणजे ४०४ रुग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळले. तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ७ हजार ९१६ एचआयव्ही बाधित रुग्ण असून त्यापैकी ५ हजार ४४४ उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले आहेत. गतवर्षभरात ०.०५ टक्के म्हणजे २४ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी २३ गरोदर माता असून, त्यांना पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले आहे. प्रत्येक गरोदर मातेची एचआयव्ही तपासणी व समुपदेशन करण्यात येत असून, एचआयव्ही तपासणी वाचून कोणतीही गरोदर माता वंचित राहणार नाही, याची खबरदारी ‘डापकू’च्या माध्यमातून घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमार्फत देण्यात आलेली जनरल क्लायंट व एनएनसीची १०० टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत खासगी रुग्णालयामध्ये एचआयव्ही तपासणी व्हावी, याकरिता साथी, मुंबई या संस्थेच्या सहकार्याने तीन प्रकारचा करार करून एचआयव्ही तपासणीची सुविधा ३३ ठिकाणी उपलब्ध आहे. रायगडमधील अलिबाग, माणगांव व रोहा येथे संशयित रुग्ण निरीक्षण नोंदीकरिता ‘सेंटीनल सर्व्हेलन्स सर्विस’ यंत्रणा ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.सरकारी आरोग्यसेवेतील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश दिवेकर, महिला व बालविकास अधिकारी बी.एस. वाघमारे, जिल्हा रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग शिंदे, डॉ. ए.आर. कोकरे, डॉ. जगदिश दिवेकर, साथी स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या जागृती गुंजाळ, आधार ट्रस्ट स्वयंसेवी संस्थेच्या मनीषा अहिवले, एस.एस.कुरणे यांनी एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी करण्याच्या अनुषंगाने बैठकीत प्रस्तुतीकरण केले. ६३ हजार ७३१ क्षयरुग्ण संशयितांची तपासणीगतवर्षभरात ६३ हजार ७३१ संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार ८५५ संशयित रुग्णांना उपचारार्थ संदर्भित करण्यात आले. यामध्ये ३९४ रुग्णांना क्षयरोग आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर क्षयरोग उपचार घेतलेल्या ३ हजार २६५ पैकी २ हजार ८८९ रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ५ रुग्णांना एचआयव्ही व क्षय (टीबी) संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यात एड्सग्रस्तांचे प्रमाण घटले
By admin | Published: February 12, 2017 3:16 AM