आगरदांडा : मुरुड समुद्रकिनारापासून काही अंतरावर गेलेल्या मच्छीमारांच्या जाळीत दररोज जेलीफिशची संख्या अधिक वाढत आहे. जेलीफिशच्या या वाढत्या अतिक्रमणाचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात माशाऐवजी जेलीफिशच मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील मच्छीमारांवर मत्स्य दुष्काळाचे संकट पुन्हा ओढवले आहे. जेलीफिशमुळे मच्छीमार कोळीबांधवांच्या हाताला खाज व सूज येत असल्याने आरोग्याचा धोका वाढला आहे.जेलीफिश हे लहान माशांच्या अंडी आणि माशांच्या पिल्लांना खातात. त्यामुळे त्या सागरी भागातील माशांच्या साठ्यावर आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो, तसेच लहान माशांना खाणारे आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले मोठे मासेही अन्नाच्या अभावामुळे त्या भागातून स्थलांतर करतात. गेल्या काही दिवसांपासून मुरुडच्या सागरी पाण्यात मोठ्या संख्येने केशरी रंगाच्या जेलीफिशची संख्या वाढल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी जेलीफिशचे थवे येत आसल्याने कोळी बांधवाना आर्थिक संकटाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने कोळी बांधवांकरिता विशेष पॅकेजची तरतूद करून होणाऱ्या हिवाळी अधिवेशानात मंजूर करावी, अशी मागणी मुरुड सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन तथा कोळीसमाज अध्यक्ष- मनोहर बैले यांनी केली आहे.
समुद्रात वाढली जेलीफिशची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:57 AM