चार बेपत्ता बोटींपैकी दोन बोटींशी वायरलेस संपर्क यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 06:47 PM2017-09-20T18:47:06+5:302017-09-20T19:34:30+5:30
मच्छीमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या मच्छिमारी बोटींची संख्या आता तीन वरुन चार झाली आहे.
- जयंत धुळप
रायगड, दि. 20 - मच्छीमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ या दोन बोटींशी वायरलेस यंत्रणोद्वारे संध्याकाळी सहा वाजण्याच्या सूमारास संपर्क झाला असून या दोन्ही बोटी मुरुड-जंजीरा समुद्रातील बॉम्बेहाय प्लॅटफॉर्म जवळ सुरक्षीत असून या दोन बोटीवरील एकूण 16 खलाशी देखील सुखरुप असल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयूक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान अलिबाग तालुक्यांतील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर शाम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’ आणि कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ या दोन बोटींचा अद्याप कोणत्याही प्रकारे थांगपत्ता लागू शकलेला नाही. या दोन बोटींवर अनूक्रमे 18 व 8 असे एकूण 26 खलाशी असल्याचे नाखवा यांनी सांगीतले. उद्या गुरुवारी तटरक्षक दलाच्या माध्यमातून या दोन बोटींच्या शोधार्थ मोहीम सूरु राहाणार आहे.
बोटींच्या शोधाकरिता भारतीय तटरक्षक दलास कळविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून बेपत्ता बोटींचा शोध सुरु करण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 60 किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने कळविले असल्याने जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीकरीता समुद्रात जावू नये असे आवाहन नाखवा यांनी केले आहे.