उदय कळस / म्हसळादिसायला किळसवाणा तरीही स्वभावाने खूपच शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्ष्याचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत आहे. सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाडांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिले तर आकाशात घिरट्या घालणारा पक्ष्यांचा थवा आपल्या नजरेस पडतो तो पक्षी म्हणजे गिधाड. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेचीवाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले आहे. या चिरगाव-बागेचीवाडी येथील ३१.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात सातवीण, आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची २३ ते २४ घरटी पाहायला मिळतात. घरटीच्या आसपास २२ ते २३ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३८ ते ४० गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेचीवाडी येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी १३ वर्षांपासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसूून येत आहे.पक्षिमित्र व सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की, भारतातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबिल व्हल्चर व व्हाइटबॅक व्हल्चर या दोन जाती रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाइटबॅक व्हल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. २००० ते २००४ मध्ये चिरगाव येथे पांढऱ्या पाठीच्या गिधाडाच्या कॉलनीचा शोध लागला. त्या वेळी या गिधाडांची दोन घरटी आढळली. आजमितीस २०१६ पर्यंत या गिधाडांच्या घरट्यांची संख्या २४ तर या जातीच्या एकूण गिधाडांची संख्या १५० पर्यंत पोहोचलेली दिसून येते. भविष्यात या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहिती केंद्राची स्थापना होणार असून जैवविविधतेसंबंधी पर्यटनातून या गावाचा विकास करण्याचा विचार सिस्केप संस्थेचा आहे.
रायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या वाढली
By admin | Published: March 23, 2017 1:36 AM