नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:36 AM2019-06-30T00:36:05+5:302019-06-30T00:36:27+5:30

नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे.

 The Nural-Kalamb road is incomplete, | नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

Next

नेरळ : नेरळ-कळंब रस्ता पहिल्याच पावसात धोकादायक बनला आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्चूनही हा रस्ता साई मंदिर परिसरात अपूर्णच ठेवण्यात आल्याने पहिल्याच पावसात या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला असून, प्रवासी आणि चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्याची पुरती वाट लागल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पोशीर गावाजवळ एका खासगी गृहप्रकल्पासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी साइडपट्टी खोदल्याने येथून प्रवास धोकादायक बनला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तसेच हे खोदकाम करताना नव्याने केलेला रस्ता उखडला आहे.
अनेक वर्षे हा रस्ता धोकादायक होता. यंदा काही भागात नव्याने रस्ता तयार करण्यात आला असला तरी काही ठिकाणी अपूर्णावस्थेत ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी साइडपट्टी खोदण्यात आल्या आहेत.
धामोते परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे; परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने यंदाही रस्ता पाण्याखाली आला आहे. धोमोते भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोशीर गावाजवळ साइडपट्टी खोदल्याने संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी, असे कार्यकारी अभियंता यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यांनी खोदलेली साइडपट्टी लवकरात लवकर बुजवावी, अन्यथा अपघात झाल्यास त्यांनाच जबाबदार धरण्यात येईल. तसेच नेरळ-कळंब रस्त्याचे काम एका ठेकेदार कंपनीला दिले असून त्यांनी हे काम साईमंदिर ते नेरळ रेल्वे गेटपर्यंत पूर्ण केले नसल्याने पहिल्याच पावसात खड्डे तयार झाले असून त्यांना नोटीस देऊन खड्डे भरण्यास सांगितले जाईल.
- अजयकुमार सर्वगौड,
उप अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title:  The Nural-Kalamb road is incomplete,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड