संजय करडे
मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार या सुट्ट्यांचा योग साधून असंख्य पर्यटक येत आहेत, परंतु त्यांना हा किल्ला पहाता येत नाही. हवामानाचा फटका शेकडो पर्यटकांना बसला असून सध्या किल्ल्याकडे जाणारी वाहतूकमोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
१ सप्टेंबरपासून किल्ल्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली, परंतु याच दरम्यान हवामान बदलामुळे जोरदार पाऊस व वारे मोठ्या गतीने वाहत असल्याने किल्ल्याच्या पायथ्याशी बोट हेलकावे घेत असल्याने किल्ल्यात उतरण्यास मोठी अडचण होत असल्याचे दिसून येत आहे; त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शनिवार, रविवारी पर्यटक येतात, परंतु हवामान अजूनही खराबच असल्याने किल्ल्यावरील वाहतूक पाहिजे तशी सुरू झाली नाही. शिडाच्या बोटीचा व्यवसाय करणारे असंख्य लोक हवामान सुरळीत होण्याची वाट पहात आहेत. ज्याप्रमाणे खोल समुद्रातून सर्व मासेमारी होड्या वेगवान वाऱ्यामुळे किनाºयाला आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे किल्ल्यातील शिडाच्या होड्या सुद्धा किनाºयाला लागलेल्या आढळून येत आहेत.
मुरुड तालुक्यात पावसाळी हवामान कायम असून पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी वाºयाचा वेग काही कमी झालेला नाही. सध्या किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर येथे वाहतूक होत नसल्याने या प्रवासी जेट्ट्यांवर शुकशुकाट आहे.शिडांच्या बोटीची वाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू झाली असली तरी २ तारखेपासूनच हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज घेऊनच ही वाहतूक होणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयातून सर्व बोटधारकांना हवामानाचा अंदाज घेऊनच वाहतूक करा अशी ताकीद देण्यात आली असून ज्यावेळी हवामान सुरळीत होईल त्यावेळी सर्व वाहतूक सुरळीत होईल. - यशोधन कुलकर्णी, सहायक बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड