ऑक्टोबर हीटने प्रचारकांचा काढला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:22 PM2019-10-14T23:22:53+5:302019-10-14T23:23:08+5:30
जोर वाढला : कडक उन्हाच्या तडाख्याने नेते, कार्यकर्ते हैराण
पाली : सुधागडात पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आॅक्टोबर हीटमुळे तालुक्यातील प्रचारकर्त्यांना चांगलाच घाम फु टत आहे. तापमानाबरोबर राजकारणाचाही पारा चढला आहे. प्रचारांचा जोर वाढला आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले आहेत. उन्हापासून बचाव व्हावा याची काळजी घेत नेते मंडळींनी प्रचार सुरू केला आहे.
पेण मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्वच पक्षांचे नेते व पदाधिकारी रस्त्यांवर उतरले आहेत; मात्र या नेत्यांना उन्हाचा फटका बसत आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार सकाळी लवकर बाहेर पडतात. तालुक्यातील प्रत्येक गावात कधी सभा, तर कधी प्रचारफेरी काढावी लागते. तर शहरीभागात महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारफेरी काढली जात आहे. सकाळी आठला उन्हाचा तडाखा जाणवतो. नऊ वाजता प्रचारफेरीत सहभागी झालेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अंगात घामाच्या धारा वाहतात. उन्हामुळे डीहायड्रेशन होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे.
उमेदवार, आमदार व काही पदाधिकाऱ्यांची चारचाकी वाहने एसी आहेत. एसीतून बाहेर पडल्यावर उन्हाचा चटका बसतो. तर उन्हातून पुन्हा वाहनात बसल्यावर एसी सुरू झाल्यावर शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवावे लागते. उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी प्रचारफेरीत सर्वजण टोप्या घालत असल्याचे दिसून येत आहे. आघाडीचे नेते पांढरी गांधी टोपी अथवा कॅप घालतात, तर महायुतीचे नेतेमंडळी भगव्या टोप्या वापरतात. उमेदवारांचा सलग धावता दौरा असल्याने पदयात्रा आणि छोट्या सभा त्यांना घ्याव्या लागतात.
सभा शक्यतो सावलीच्या ठिकाणी अथवा मंदिरात घेतल्या जात आहेत. राजकीय नेत्यांपेक्षा कार्यकर्ते भलतेच बिझी झाले आहेत. सध्या उमेदवार हे उघड्या चारचाकी वाहनातून आपला प्रचार करत असल्याचे पहायला मिळते.
हलक्या जेवणावर भर
अतिथंड पाण्याने अनेक नेत्यांना घशाचा त्रास सुरू झाला आहे. नेतेमंडळींना भाषणे करावी लागत असल्याने अतिथंड पाणी पिण्याचे टाळत आहेत, तर दुपारी सर्वच नेते मंडळी शाकाहारी, हलके जेवण घेतात. जेवणात काकडी, टोमॅटो या सॅलडबरोबर फळांचा आहारात समावेश केला जात आहे. चहाऐवजी सरबत व ज्यूसला प्राधान्य दिले जात आहे..