दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

By निखिल म्हात्रे | Published: June 7, 2024 09:08 AM2024-06-07T09:08:24+5:302024-06-07T09:08:52+5:30

अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

off fishing for two months boats anchored on the shore | दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सून दाखल झाल्याने मासेमारी हंगाम १ जून ते ३१ जुलै असा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारांहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी, तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिने या बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दहा महिने मासेमारी व्यवसाय चालतो. मासेमारीतून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
अलिबाग, आक्षी, बोर्ली, रेवदंडा, नवगाव आदी बंदरांवर मासळीचा मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु, अनेकवेळा बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छिमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत.

जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजनोत्पादन कालावधी असतो. त्यामुळे दोन महिने मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छिमारांनी नौका किनारी लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील काही बंदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून, काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे.

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर मोठ्या होड्या एक महिना अगोदर उभ्या केल्या आहेत. लहान होड्या बंदर किनारी नांगरण्यास आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. सध्या बोटींवर प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरू आहे. - विजय गिदी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

Web Title: off fishing for two months boats anchored on the shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.