मुलींच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:18 AM2018-11-21T00:18:52+5:302018-11-21T00:18:59+5:30
नवीन पनवेल येथील पंचशीलनगरला लागून असलेल्या रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सोमवारी तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे.
पनवेल : नवीन पनवेल येथील पंचशीलनगरला लागून असलेल्या रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सोमवारी तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी याप्रकरणी साई प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व एस. एन. नाईक अँड ब्रदर्स या ठेकेदारांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट रुंदीकरण व सबवेचे काम सध्या सुरू आहे. जवळपास ३२ कोटी रु पयांचे हे काम असून २०१५ पासून सुरू आहे. रेल्वेच्या रुंदीकरणासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोमवारी याच खड्ड्यात बुडून ८ ते १३ वयोगटातील तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. या तिन्ही लहान मुलींच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारालाच जबाबदार धरले जात आहे.
दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसण्यास सुरु वात केली आहे. हे पाणी यापूर्वीच ठेकेदाराने काढले असते तर तीन मुलींचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ठेकेरादाने या ठिकाणी सुरक्षा क्षक, सुपर वायझर यापैकी कोणाचीही नेमणूक केलेली नव्हती.
सोमवारी रात्री उशिरा या तिन्ही मुलींचे शवविच्छेदन करण्यात आले. धोसले कुटुंबीयांचे हातावर पोट असल्याने परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे तिन्ही मुलींचे मृतदेह गावी अमरावतीला नेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर खांदेश्वर पोलिसांनी पैशांची मदत करून रु ग्णवाहिकेतून शव अमरावती येथे अंत्यविधीसाठी पाठवले.
ठेकेदारा विरोधात गुन्हा
पनवेल रेल्वे स्थानकाजवळील खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या तीन मुलींच्या प्रकरणी साई प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व एस. एन. नाईक अँड ब्रदर्स यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाजवळील खड्ड्यात बुडून प्रतीक्षा धोसले, रोहिता धोसले, रेश्मा धोसले यांचा सोमवारी मृत्यू झाला. फलाट रुंदीकरणांचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडला.