परवानगीशिवाय लग्नसोहळे केल्यास गुन्हा; शासकीय कारवाईला सामोरे जावं लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:29 AM2020-07-01T00:29:37+5:302020-07-01T00:29:52+5:30
पनवेलमधील नेरे गावात दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या हळदीमुळे १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे
पनवेल : शासनाकडून लग्न समारंभाला अटी व शर्तींच्या आधारे परवानगी दिली जाते आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून कोणतीही परवानगी न घेता, सर्रास लग्न सोहळे आयोजित केले जात असल्याने, विनापरवाना लग्नसोहळे आयोजित केल्यास प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली आहे.
पनवेलमधील नेरे गावात दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या हळदीमुळे १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाची नजर चुकवून झालेल्या या प्रकारामुळे नवरदेवाच्या भावाला आपला जीव गमवावा लागला होता. पनवेल तालुक्यातील अनेक ठिकाणी लग्नाची परवानगी घेऊन गावांमध्ये हळदीचे सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. हे हळदीचे सोहळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभास काही ठरावीक व्यक्तींसाठी परवानगी दिली जात आहे. प्रत्येकाने खबरदारी घेऊन प्रशासनाची परवानगी घेऊन लग्न समारंभ आयोजित करावे, अन्यथा शासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.