रायगड : जिल्ह्यातील नारळी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसत आहे. कोळी समाज दरवर्षी नारळी पौर्णिमेला पालखीतून मिरवणूक काढून सागराला नारळ अर्पण करतात. मात्र, या वर्षी त्यांच्या या परंपरेला तडा गेला आहे. पाच जणांनी एकत्र येत सण साजरा केला. सुमारे २५० वर्षांत प्रथमच कोळी समाजाला ही प्रथा मोडावी लागल्याचे बोलले जाते.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण बहुतांश एकत्रितच येतात. या वर्षीही भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण एकाच दिवशी आले आहेत. कोळी समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहेत. त्याचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. जून ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत मासेमारी बंद असते. या कालावधीत पावसाचा हंगाम असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असतो, तसेच माशांच्या प्रजननाचाही हाच कालावधी असल्याने मासेमारी केली जात नाही. समुद्रावरच मासेमारी समाजाचा उदरनिर्वाह असल्याने समुद्रावर त्यांची खूपच श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून त्याला नमस्कार केला जातो.
मासेमारी समाजावर अशीच कृपादृष्टी ठेव, अशी आर्त विनवी ते सागराला करतात. ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. सागराला नारळ अर्पण करताना पालखीतून नारळाची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. याप्रसंगी सर्वच नागरिक पारंपरिक पद्धतीने नवीन कपडे परिधान करतात. अतिशय भक्तिमय आणि जल्लोषमय वातावरण असते. मात्र, या वर्षी कोरोनामुळे मिरवणूक काढण्यावर सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोळी समाजाला मिरवणूक काढता आलेली नाही. जिल्ह्यातील ३३ पालखी मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला आहे. अलिबाग येथील कोळी समाजातील पाच व्यक्तींनी मिळून सागराला नारळ अर्पण केला.सागराला नारळ अर्पण करण्याची पिढ्यान्पिढ्याची परंपरा आहे. गेल्या २५० वर्षांत प्रथमच कोरोनामुळे आमच्या या प्रथेत खंड पडला आहे, असे अखिल कोळी समाज परिषदचे अध्यक्ष अॅड.जे.टी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे. याच कारणांसाठी मिरवणुका रद्द केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोळी समाज मूळचा मराठवाड्यातीलकोळी समाज हा मराठवाड्यातून समुद्र किनारी राहण्यासाठी आलेला आहे. त्या ठिकाणी दुष्काळ पडल्याने नदीमध्ये मासेमारी करता येत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने यावे लागल्याचे आमच्या पूर्वजांकडून ऐकले आहे, असे प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नारळ समुद्राला देण्याची आमची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आता मात्र ती मोडीत निघाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नारळ फोडाफोडीच्या स्पर्धेला ब्रेकनारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त नारळ फोडाफोडीच्या स्पर्धा भरवण्यात येतात. तर भाजी मार्केट, नाक्यावर, चौका-चौकात नारळ फोडाफोडी खेळताना दिसून येणाºया तरुणांचा घोळका दिसला नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या नारळ खरेदी-विक्रीच्या व्यवसायाही ब्रेक लागला. कोरोनाचे सावट पसरल्याने कमी किमतीमधील नारळही विकत घेता आले नाहीत, असे सुहासिनी साष्टे या गृहिणीने सांगितले.