अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द
By admin | Published: April 13, 2016 01:23 AM2016-04-13T01:23:13+5:302016-04-13T01:23:13+5:30
रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार २५९ विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी रद्द केल्या आहेत. पनवेल तालुक्यातील सर्वाधिक ३५०
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार २५९ विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी रद्द केल्या आहेत. पनवेल तालुक्यातील सर्वाधिक ३५०, तर अलिबाग १६५ आणि उरण तालुक्यातील १२७ विशेष कार्यकारी अधिकारी यांचा यात समावेश आहे. त्या त्या तहसीलदार कार्यालयाकडून अद्याप त्यांना पद रद्द झाल्याचे पत्र गेलेले नाही. त्यामुळे ते समाजामध्ये साहेब म्हणूनच वावरत असल्याचे दिसून येते.
सामाजिक जाणीव ठेऊन सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी हे पद आहे. ३ मार्च २०१६ च्या आदेशाने १७ जानेवारी आणि ५ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्याकडील शिक्के, ओळखपत्र, प्रमाणपत्र प्रशासनाकडे तातडीने जमा करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत त्या त्या तहसीलदार कार्यालयातून विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्याचे पत्र अद्याप विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले नाही. त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी असलेले अद्यापही त्याच पदावर असल्याच्या आविर्भावात वावरत असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तीन हजार २८५ विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका करायच्या होत्या. पैकी एक हजार २५९ नेमणुका करण्यात आल्या होत्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाने नेमणुका रद्द केल्या आहेत.
रद्द केलेल्या नेमणुका
अलिबाग १६५
मुरुड ७०
पेण ४९
पनवेल ३५०
उरण १२७
कर्जत ११९
माथेरान ०
खालापूर ८५
माणगाव १०९
तळा २३
रोहे ३५
सुधागड १८
महाड ४७
पोलादपूर ०
म्हसळा ३२
श्रीवर्धन ३०
एकूण १,२५९