कर्जत : तालुक्यातील कडाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात नव्याने सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासी संकुलाचे प्रत्यक्षात काम अपूर्ण आहे, मात्र कर्जत येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गंगावणे यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीत काम पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली असून कामाच्या बाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी निवासी संकुलाची इमारत उभी आहे, मात्र या इमारतीचे काम अपूर्ण आहे, म्हणून स्थानिक रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गंगावणे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला माहितीच्या अधिकारात माहिती मागविली. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले सुमारे २२ लाख रु पये खर्चाचे वैद्यकीय अधिकारी निवास संकुलाचे काम अपूर्ण असून तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, विद्युत पुरवठा नाही, अंतर्गत असलेली अनेक कामेही अपूर्ण आहेत तरी देखील काम पूर्ण झाले आहे, असे माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. जानेवारी २०१४ रोजी सुप्रभात इंफ्राझोन प्रा. लि. कंपनीने वैद्यकीय इमारतीचे काम सुरू केले आणि आॅक्टोबर २०१६ रोजी काम पूर्ण झाल्याचे दाखवून कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात इमारत दिली असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या हस्तांतरण पत्राव्दारे समोर आले आहे. प्रभाकर गंगावणे हे पाहणी करण्यासाठी घटनास्थळी गेले तेथे उपस्थित असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी सी. के. मोरे यांनी आमच्याकडे त्या संकुलाच्या चाव्या नाहीत असे सांगितले. मग माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत इमारत ताब्यात दिली आहे, मात्र प्रत्यक्ष इमारत आजही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात नाही असे विदारक चित्र समोर आले आहे. हस्तांतरण पत्रावर मात्र कडाव वैद्यकीय अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशनचे (एन.एच.एम.) उप अभियंता या दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर इमारत पूर्ण झाली नव्हती तर हस्तांतरणाची घाई का? असा प्रश्न गंगावणे यांनी उपस्थित के ला आहे.काम पूर्ण नसताना ठेकेदाराने इमारत ताब्यात का दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ती अपूर्ण असताना कोणाच्या सांगण्यावर ती ताब्यात घेतली याची चौकशी व्हावी, अशी मागणी गंगावणे यांनी केली आहे. (वार्ताहर)
अधिकारी संकुल कागदोपत्री पूर्ण
By admin | Published: January 30, 2017 2:10 AM