खारकोपर -उरण रेल्वे मार्गाची अधिकाऱ्यांकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:29 PM2024-01-06T20:29:40+5:302024-01-06T20:30:29+5:30
१२ जानेवारी रोजी प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर अधिकाऱ्यांचे मौन.
मधुकर ठाकूर, उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारकोपर पर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर शनिवारी (६) मुख्य रेल्वे ट्रॅक अभियंता अविनाश पांडे यांनी त्यांच्या पथकासह रेल्वे मार्गावरील ट्रॅकची पाहणी केली. या पाहणीवेळी आलेल्या रेल्वेला पाहायला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.
उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारकोपर पर्यंत प्रवासी वाहतूक पाच वर्षांपासून सुरू झाली आहे.दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण दरम्यानचा १८ किमी अंतरापर्यंतची प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या अनेक सुरक्षा चाचण्या पार पडल्या आहेत.मात्र रेल्वे मार्गावरील अनेक तत्सम कामे अद्यापही पुर्णत्वास गेलेली नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्याने विलंबाने सुरू झालेले जासई-गव्हाण रेल्वे स्थानकाचे तर काम आजही अर्धवट अवस्थेत सुरू आहे.या मार्गावरील उर्वरित स्थानकांमधील कामेही थोड्याफार फरकाने सुरू आहेत.सुरक्षा चाचण्या करण्यासाठी अनेक वेळा रेल्वे उरण स्थानकापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे
या मार्गावरुन लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी अटकळ नागरिकांना बांधतात.मात्र त्यांच्या अनेक वेळा भ्रमनिरास झाला आहे.
शनिवारी (६) सकाळी १ वाजताच्या सुमारास मुख्य रेल्वे ट्रॅक अभियंता अविनाश पांडे हे त्यांच्या पथकासह रेल्वे मार्गावरील ट्रॅकची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते.यावेळी परख रेल्वे तपासणी वाहनही स्टेशनावर घुसले होते. कर्मचाऱ्यांचीही रेल्वे फलाट, भुयारी पादचारी मार्गातील साफसफाईच्या कामात गुंतले होते. यामुळे उरण स्टेशनात रेल्वे पाहण्यासाठी हौशी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.अटल सेतूचे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहेत.त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे का याचीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र १२ जानेवारीला प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.यामुळे रेल्वे सुरू होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.