मापगाव येथे अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:54 AM2021-04-23T00:54:34+5:302021-04-23T00:55:00+5:30
अलिबाग तालुक्यातील घटना : जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालविवाह थांबविण्याबाबतची यशस्वी कार्यवाही करण्यात आली.
मापगाव येथे बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मिळाल्यावर प्रत्यक्ष गावात भेट देऊन एकूण चार बालकांचे बालविवाह होत असताना बालकांचे आई-वडील व नातेवाइकांना समज देत त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले. मापगाव येथील रहिवासी असलेली भावंडे, त्यापैकी एका मुलीचे वय १६ वर्षे व मुलाचे वय १९ वर्षे होते. मुलीचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलाचे वय १९ वर्षे व मुलाचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलीचे वय १७ वर्षे इतके होते. हे सर्वजण पोयनाड नागझरी आदिवासी वाडी येथील रहिवासी आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून, पालकांकडून जबाबनामा लिहून घेऊन पालकांना समज देण्यात आली आहे.
अल्पवयीन बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी मापगाव येथील पोलीस पाटील अपेक्षा टुळे, अलिबाग पोलीस स्टेशनमधून मिनल मगर, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एम. वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ, समुपदेशक अजिनाथ काळे, क्षेत्रीय कार्यकर्ता दशरथ चौधरी, संदीप गवारे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी अमोल जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी मोहिनी रानडे, प्रशांत घरत, आदी उपस्थित होते. या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांनी गाव बाल संरक्षण समिती सदस्य व आई-वडिलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांचे समुपदेशन करून त्यांना समजही देण्यात आली.