अलिबाग : रायगड जिल्ह्याला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपले असून २४ तासांत १७२६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात जागोजागी पाणी साचले तर वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर अलिबाग-पेण रस्त्यावरील पळी येथे महाकाय वृक्ष पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र काही कालावधीतच वाहतूक सुरळीत झाली.
या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. भाताची रोपे कुजल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून भात पिकाला जीवदान मिळाले आहे. या जोरदार पावसामुळे अलिबाग बस स्थानक, पेण शहरातील विक्रम स्टँड, धरमतर मार्ग, बाजारपेठ, विठ्ठल आळी, कोळीवाडा, महावीर मार्ग, चिंचपाडा, उत्कर्ष नगर आणि इतर सखल भागात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला.
पावसाने दोन दिवसांपूर्वी रायगडातील काही भागामध्ये हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर शेतीच्या कामांना वेग आला आहे. मागील आठ दिवसांपासून पडणाºया कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती.
गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत आहे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली.
अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, माणगाव, पेण, तळा या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसासोबत आलेल्या वादळी वाºयांमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.