- आविष्कार देसाई अलिबाग : दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणासह नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता समुद्रालाही विविध प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या कालावधीत त्यामध्ये वाढ होत असल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने तेलाचा तवंग आल्याने चिंतेमध्ये भर पडली आहे. या आधी मुंबईमधील कचरा हा अलिबाग तालुक्यातील किहीम, नागाव येथील समुद्रकिनारी आला होता. समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे जलचर प्राणी, वनस्पती यांना धोका निर्माण झालाआहे. मुंबईला जवळ असणारा जिल्हा म्हणून अलिबागची ओळख आहे. मुंबईला खेटूनच उरण तालुक्यामध्ये जेएनपीटी बंदर आहे. या बंदरामधून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्याने येथे मोठमोठी जहाजे, बोटी यांची कायमचीच वर्दळ सुरू असते. बंदरामधून प्रवासी वाहतूकही केली जाते.काही मोठमोठ्या जहाजातील वापरून झालेले तेल बिनदिक्कतपणे थेट समुद्राच्या पाण्यात सोडून दिले जाते, तर काही वेळेला जहाज फुटून त्यामधील तेल समुद्राच्या पाण्यामध्ये फेकले गेल्याच्याही घटना घडत असतात. मुंबई आणि उरण परिसरातील कचरा हा समुद्राच्या पाण्यात टाकण्यात येतो. समुद्राला भरती आल्यावर निमुळत्या असणाºया चॅनेलमध्ये तो वाहत जातो. हे निमुळते चॅनेल म्हणजे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, घनकचरा मोठ्या प्रमाणात किहीम, नवगाव, थळ, वरसोली, नागाव यासह अन्य समुद्रकिनारी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या जोडीला गेल्या दोन दिवसांपासून तेलाचे तवंगच्या तवंग अलिबागच्या समुद्रकिनारी दिसून येत आहेत.अलिबागचे समुद्रकिनारे स्वच्छ आहेत. त्यामुळे येथे पर्यटक तर येतातच, शिवाय मार्निंग वॉक करण्यासाठी सकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी खूप गर्दी असते. समुद्रावर चालताना तेल पायाला लागत असल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.खोल समुद्रामध्ये मोठमोठ्या जहाजातून खराब तेल फेकले जाते. समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नसल्याने सर्व कचरा, तेल हे समुद्रकिनारी फेकून देते. अशा घटना सातत्याने घडत असतात, असे येथील स्थानिक मासेमारी करणाºयांनी सांगितले.अलिबाग हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. येथील समुद्रकिनारे त्यांना विशेष करून आवडत असल्याने त्यांना येथे समुद्र स्नानाचा आनंद घ्यायला आवडते. मात्र, समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यटक पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित असणारी हॉटेल इंडस्ट्री, तसेच त्यावर अवलंबून असणाºया विविध छोट्या-मोठ्या उद्योगांवर विपरित परिणाम होऊन आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.समुद्रातील प्रदूषण सातत्याने वाढत असल्याने त्याचा विपरित परिणाम समुद्रातील जीवसृष्टीवर होत आहे. जलचर वनस्पती,प्राणी यांचे आरोग्य धोक्यात येऊन अन्न साखळी तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:01 AM