अलिबाग-रेवदंडा मार्गावरील जुन्या पुलांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:11 AM2018-05-21T06:11:40+5:302018-05-21T06:11:40+5:30
या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही तर पावसाळ्यात या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटण्याची शक्यता आहे.
बोर्ली-मांडला : अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही तर पावसाळ्यात या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील साळाव रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ मध्ये करण्यात आले असून पुलाची लांबी ५१० मीटर आहे. पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी चणेरा, रोहा, नागोठणे मार्गे वडखळ पेण किंवा साळाव जेट्टी वरून छोट्या होड्यांनी रेवदंडापर्यंत जलप्रवास करावा लागे. मात्र पूल झाल्यानंतर वाहतूक जलद मार्गाने सुरू झाली. त्यामुळे मुरुड तालुक्याचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास झाला.
साळाव येथे १९८७-८८ मध्ये बिर्ला उद्योग समूहाचा लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध झाला, यावेळी दळणवळणासाठी पूल महत्त्वाचा ठरला.
देखभाल दुरुस्तीअभावी सध्या पुलाच्या चौथ्या आणि पाचव्या जॉइंटमध्ये भेगा पडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम हाती घेणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी पुलाला पडलेली भेग, खड्डे बांधकाम विभागाने काँक्रीटीकरण करून बुजवले होते.
मुरुडमध्ये येणारे पर्यटक याच पुलावरून येत असल्याने वर्षभर या पुलावर वाहनांची वर्दळ असते. त्याप्रमाणे अवजड वाहनेही याच पुलावरून ये-जा करतात. पुलावरून किती क्षमतेची वाहने जावी, या संदर्भात बांधकाम विभाग अलिबाग यांनी संबंधित पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली दिसत नाही.
अलिबाग-रेवदंडा या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने नागावला जोडणारा सहाण -पाल्हे या बाह्य मार्गावर साखर खाडी पूल उभारला आहे. पुलाची लांबी ५२ मीटर असून या पुलालाही जवळपास ३० वर्षे झाली आहेत. अवजड वाहतुकीमुळे पुलाची दुर्दशा झाली आहे. पुलाच्या खालच्या बाजूस काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी ते कोसळल्याने लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागाव येथून रोह्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा पुलामुळे बराच वेळ वाचतो आहे, मात्र साखर खाडी पूल बंद झाला तर जवळपास १० गावांचा संपर्क तुटणार आहे.
नवेदर बेली पूल
लोखंडी पाइप तुटले
१नवेदर बेली पूलही जीर्णावस्थेत असून सुरक्षेसाठी असलेले दोन्ही बाजूचे लोखंडी पाइप तुटलेले आहेत. शिवाय पुलासाठी असलेल्या निमुळत्या असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
२परिसरात आक्षी येथे काही वर्षापूर्वी नवा पूल बांधण्यात आला असला तरी जुन्या पुलाची डागडुजी केल्यास हलक्या वाहनांसाठी तो सोयीचा ठरेल, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
३पुलाचे दोन्ही बाजूला उतार असल्याने वाहनांची समोरासमोर ठोकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय आक्षी रेवदंडा मार्गही अरुंद असल्याने एकाचवेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होते. अलिबाग, रेवदंडा, साळाव परिसरातील पुलांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील बेली, आक्षी, नागाव सहाण पाल्हे या मार्गावरील साखर खाडीवरील पूल आणि साळाव रेवदंडा पूल आदींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. त्याचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.
- मधुकर चव्हाण, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अलिबाग
सध्या पुलाच्या संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही कठड्यांचा भाग कोसळला आहे. मध्यंतरी तीन ते चारवेळा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेट्टीवर जाणाºया दगडी कोळशाच्या बार्जच्या धडकेमुळे पूल अधिकच कमकुवत झाला आहे.