कर्जतमध्ये जुन्या कारला आग; बालकाचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:14 AM2019-03-25T01:14:46+5:302019-03-25T01:14:58+5:30
तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
नेरळ : तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
उमरोली येथे एमएच ०२ एनए ५६२५ ही बंद गाडी तीन महिन्यांपासून रस्त्यावर उभी होती. गाडीच्या काचा उघड्या असल्याने परिसरातील लहान मुले त्यात खेळायची. २२ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास या गाडीला आग लागली. शेजारी असणाऱ्या महिलांनी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी आग विझविली. या आगीत अभय उमेश बुंधाटे होरपळला.
ग्रामस्थांनी त्याला तातडीने डिकसळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास नवी मुंबईत असलेल्या ऐरोली भागातील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. शुक्रवारी रात्री त्याला ऐरोली येथे नेले. मात्र, दुसºया दिवशी २३ मार्च रोजी सकाळी अभयचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत ऐरोली पोलीस ठाण्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जत पोलीस कारवाई करणार आहेत. अर्धवट जळालेली कार अजूनही तेथेच पडून आहे.