पालीमध्ये जुन्या नोटा जप्त
By admin | Published: May 19, 2017 12:52 AM2017-05-19T00:52:17+5:302017-05-19T00:52:17+5:30
मोदी सरकारने ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सात महिने उलटले आहेत, शिवाय जुन्या नोटा बदलण्याची मुदतही संपली आहे
- लोकमत न्यूज नेटवर्क
राबगाव / पाली (रायगड) : मोदी सरकारने ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सात महिने उलटले आहेत, शिवाय जुन्या नोटा बदलण्याची मुदतही संपली आहे. मात्र सुधागड पाली येथून २ कोटी १९ लाख ६५ हजारांच्या जुन्या नोटा पाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पाली-खोपोली मार्गालगत खुरावले फाटा वसुधा फार्म येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी खोपोलीकडून पालीकडे जाणाऱ्या दोन कार खुरावले फाटा येथे वसुधा फार्मच्या बाहेर उभ्या असताना पकडण्यात आल्या. यावेळी गाडीत बसलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरे दिली. या दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता गाड्यांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या. त्याचे मूल्य एकूण २ कोटी १९ लाख ६५ हजार रु पये आहे. या प्रकरणी पाली पोलिसात आरोपी प्रमोद सावंत (रा.दिवा), नवीन लक्ष्मीदास जोबानापुत्रा (रा.मानपाडा, डोंबिवली), मोती किसनचंद मुधुवानी (रा.उल्हासनगर) व इतर पाच असे एकूण आठ जणांच्याविरोधात मुंबई पोलीस अधिनियम १२४ अन्वये या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्याने याबाबत न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
आयकर विभाग, ठाणे व आरबीआय बँक, नवी मुंबई यांना या नोटांच्या पुढील कारवाईबाबत सविस्तर अहवाल पाठविला आहे.