गावोगावच्या यात्रांमधून जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा!
By निखिल म्हात्रे | Published: May 24, 2024 08:20 AM2024-05-24T08:20:22+5:302024-05-24T08:20:45+5:30
जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : सध्या ग्रामीण भागातील विविध गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरू आहे; तसेच शाळांनाही सुट्या लागल्याने चाकरमानी आपल्या मुलांसह आपल्या गावी आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता काळातही काही गावांत यात्रा भरली. त्यानंतर आता उरलेल्या यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात होत असून, यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
गावची यात्रा म्हणजे सर्वांसाठी एकप्रकारे मोठा उत्सव असतो. यामध्ये पै-पाहुणे, जुने सवंगडी यांच्या गाठीभेटी घडून येतात. कोरोना काळात मात्र है सर्व थांबलं गेलं होतं. गतवर्षीपासून पुन्हा मोठ्या स्वरूपात यात्रा होऊ लागल्या. यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या निर्बंधांमुळे मनोरंजन करणाऱ्या मंडळांना काही प्रमाणात फटका बसला, अशा परिस्थितीत ते आपली कला सादर करताना दिसले.
सध्या उन्हाळा कडक जाणवत आहे; मात्र तरीही सुट्या व ग्रामदैवत यात्रांमुळे गावोगावचे वातावरण गर्दीने बहरून जात आहे. यात्रेसाठी आलेले चाकरमानी, नागरिक हे आपल्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन छबिन्यात गुलालाने माखून वाद्याच्या तालावर देहभान हरपून ठेका ठरत मनमुराद आनंद घेत आहेत. दरम्यान, आपल्या कुटुंबासमवेत यात्रेत वस्तूंची खरेदी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक तमाशा मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शौकीन येताना दिसतात. वास्तविक पूर्वीच्या तुलनेत ही संख्या सध्या कमी झाल्याचे गावोगावी दिसते. वय कितीही झाले तरी जुन्या मित्रांसोबत यात्रेत फेरफटका मारून कुस्त्यांचाही आस्वाद घेणारी जीवलग मंडळी एकमेकांची गप्पांच्या माध्यमातून विचारपूस करावयास विसरत नाही, हे तितकंच सत्य आहे. तर जेवणावळीसाठी एकमेकांना बोलवून आदरातिथ्य जपले जात आहे.