रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:26 AM2020-05-22T00:26:42+5:302020-05-22T00:27:21+5:30

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही.

Olive Ridley tortoise extinction in Raigad | रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

googlenewsNext

- आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढता विकास आणि त्या अनुषंगाने होणारे प्रदूषण पर्यावरणाच्या मुळावरच घाव घालत आहे. चार दशकांपूर्वी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणारे आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासवच आता नामशेष झाले आहेत. त्याचप्रमाणे तेथेच आढळणारी स्पिनिफेक्स या वनस्पतीचेदेखील अस्तित्व संपुष्टात आल्याने जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही. प्रदूषणाच्या माध्यमातून सातत्याने पर्यावरणावर आघात होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ते उधळन केलेली आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असायचे. अलिबागमधील विशेषत: वरसोलीमधील समुद्रकिनारी ८० च्या दशकात आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव सर्रास दिसून येत होते. अंडी घालण्यासाठी कासवाच्या माद्या येथे येत होत्या. कासवांच्या प्रजननासाठी हे ठिकाण अतिशय योग्य असल्याने कासवांची येथे वर्दळ पाहायला मिळायची; परंतु कालांतराने प्रदूषण वाढत गेले. त्यामुळे कासवांना पोषक असलेले वाळूचे पट्टे नाहीसे झाले, तसेच कासवांना अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली वाळूची खोलीही गायब झाली. याच कारणांनी आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा वावर संपुष्टात आल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

आज विकासाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे मानव विकासाच्या नावाखाली एक प्रकारे निर्सगाला आव्हानच देत आहे. जैवविविधतेवर आघात करून निसर्गचक्र तुटत चालले आहे. प्रदूषण रोखून निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकांचे जतन, संगोपन होणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहीजे. संतुलन राखून विकास होण्यास काहीच हरकत नाही.
- डॉ. अनिल पाटील, पर्यावरणतज्ज्ञ

प्रदूषण बंद झाले पाहिजे. खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटी वनस्पतीत समुद्राच्या प्रंचड लाटा थोपवण्याची ताकद आहे. आज त्यांचे योग्य संवर्धन होत नसल्याने खाडीकिनारची बंदिस्ती तुटून समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसत आहे.
- राजन भगत, पर्यावरणप्रेमी
नवी मुंबईतील
किनारा फ्लेमिंगो
अभयारण्य घोषित - पान/३

वन्यजीवांवर विपरीत परिणाम
रायगडमध्ये जिल्ह्यात स्पिनिफेक्स नावाची वनस्पती समुद्रकिनारी दिसून यायची. उंच गवतासारखी वाढायची आणि त्यांना सुंदर फुले असायची, ती आता नाहीशी झाली आहे. या वनस्पतींचा नामशेष होण्याने निसर्गचक्राला फार मोठा आघात झालेला आहे.
पाणथळ जागा, पाणवठच्या जागाही आता वाढत्या विकासापुढे भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे वन्य पक्षी, जीव-जंतू याच्यावरही विपरीत परिणाम होऊन त्यांचा अधिवास नामशेष होत असल्याने हे पर्यावरणासाठी गंभीर बनत आहे.
या सर्वांचा एकत्रित परिणाम महापूर, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा आपत्तीच्या माध्यमातून समस्त मानव जात अनुभवतच आली आहे. विकास निश्चितच झाला पाहिजे. मात्र, तो निसर्गाला धक्का न पोहोचवता तरच पर्यावरण आणि जीवसृष्टी टिकणार आहे.

Web Title: Olive Ridley tortoise extinction in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड