ओलमण-चेवणे रस्ता आठ दिवसांतच उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:25 AM2021-04-05T01:25:57+5:302021-04-05T01:26:09+5:30
वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या रस्त्याची स्थिती
कर्जत : तालुक्यातील साळोख ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. मात्र, ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसांतच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खडी उखडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारावी, दळणवळणाची सोय व्हावी याकरिता शासनाने खेड्यापाड्यात रस्त्याचे जाळे निर्माण केले. मात्र, अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीअभावी या गावा पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक गावांचे अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले. त्यातील दोन कोटींचा नवीन निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साळोख ओलमन - चेवणे सुमारे आठ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ४० लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवातही करण्यात आली आहे. ओलमन ते तेलंगवाडी दरम्यान नवीन झालेल्या रस्त्यावरील खडी उखडल्याने खड्डे पडले आहेत, वर्षानुवर्षे हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. ठेकेदाराने काम सुरू केल्याने परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत होते. आता तरी प्रवास सुखकर होईल या आशेवर होते. मात्र, केवळ आठ दिवसांतच नवीन तयार केलेला रस्ता खड्डेमय झाल्याने ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे उघड झाले.
ओलमन - चेवणे रस्त्यावर अडीच किलोमीटर भाग हा वनविभागाच्या जागेतून जात असल्याने वनविभागाने ठेकेदारास काम थांबविण्यास सांगितले आहे. हा रस्ता तीव्र उताराचा असल्याने ट्रॅक्टर जाऊन रस्ता उधळला आहे.
- दिनेश परदेशी, उपअभियंता
पंतप्रधान ग्राम सडक योजना
'चेवणे रस्ता वनविभागाच्या जागेतून गेला आहे, त्या भागातील काम थांबविण्यात आहे.'
- नीलेश भुजबळ, वनाधिकारी