अलिबाग : निरीक्षक वैध मापन शास्त्र अलिबाग विभाग यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त शुक्रवारी अलिबाग बसस्थानक येथे जागो ग्राहक अभियानांतर्गत ग्राहकांचे आणि बसस्थानक परिसरातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी निरीक्षक वैध मापन शास्त्र विभागाचे अधिकारी सु. रा. देवकाते यांनी नागरिकांना ग्राहकांचे अधिकार, नागरिकांनी फसवणूक होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली.
तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू खरेदी करू नये, वस्तूवर उत्पादनाची तारीख आणि वैधतेची तारीख बघूनच वस्तू खरेदी करावी, असे आवाहन केेले. वैध मापन शास्त्र यंत्रणेतील तोलन व मापन उपकरणांची माहितीही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी क्षेत्र सहायक अरुण पवार, ग्राहक प्रतिनिधी किशोर नाईक, दत्ताराम शेळके, सागर शेळके, रोहिदास थळे, संदेश माळी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.