दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीदारांची रेलचेल; कोट्यवधीची उलाढाल
By निखिल म्हात्रे | Published: November 10, 2023 08:10 PM2023-11-10T20:10:29+5:302023-11-10T20:10:38+5:30
दिवाळीच्या सणाला रविवारी सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशी यानंतर रविवारी लक्ष्मीपूजन आणि मंगळवारी, बुधवारी पाडवा, भाऊबीज आहे.
अलिबाग - दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील विविध प्रकारच्या कपड्यांची दुकाने, सोन्या-चांदीची दुकाने यासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि फटाके खरेदी करण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे.
दिवाळीच्या सणाला रविवारी सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशी यानंतर रविवारी लक्ष्मीपूजन आणि मंगळवारी, बुधवारी पाडवा, भाऊबीज आहे. सध्या बाजारपेठेतील विविध भागांमध्ये पूजेचे साहित्य, लक्ष्मीच्या मूर्ती, पणती, सजावटीचे साहित्य आणि आकाश कंदीलसह वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग अशा साहित्याच्या खरेदीला सध्या अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. कपड़ा मार्केट, फटाके मार्केट आणि सोन्या चांदीची दुकाने सोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी अशा सर्वच बाजारपेठेमध्ये ग्राहक विविध प्रकारच्या वस्तूंची पाहणी तसेच नोंदणी करुन ठेवत आहेत. पाडवा, भाऊबीजच्या निमित्ताने सोन्या-चांदीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आताच अनेकजण सोन्या- चांदीची मागणी नोंदवून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील आठ ते दहा दिवसांपासून किराणा साहित्यासह रंगरंगोटी, सजावटीचे साहित्य आणि आवश्यक असलेल्या विविध बाबींची खरेदी केली जात आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार व्यापाऱ्यांनी विविध ठिकाणाहून साहित्य मागविले आहे. शेतकरी असो की शहरी भागातील पगारदार यांच्याकडून खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत हा उत्साह अजून वाढण्याची शक्यता आहे.
किराणा साहित्य खरेदीची उलाढाल
शहरातील किराणा दुकानांमध्ये तसेच बाजारपेठेतील ठोक विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या किराणा साहित्य खरेदीची लगबग सुरु आहे. मागील आठ दिवसांपासून किराणा बाजारपेठेत मात्र ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. याशिवाय स्वीट मार्ट, केटरर्स आणि फराळ साहित्य बनविणाऱ्यांकडून सुद्धा विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ, चिवडा आणि फराळ साहित्य तयार केले जात आहे. त्यामुळे या बाजारपेठेतही ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे.
ग्राहकांच्या पसंदीला उतरणारे विविध प्रकारचे कपडे मुंबई तसेच अहमदाबाद येथून मागविले आहेत. यंदा कपडा साहित्याच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अजून दोन-तीन दिवसात गर्दी वाढेल. - रितेश जैन, व्यापारी.
लक्ष्मीपूजनाची वही, रोजमेळची खरेदी सुरू आहे. लक्ष्मीपूजन वही किमान ३५ रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रोजमेळ अडीचशे रुपये ते सहाशे रुपयांपर्यंत आहे. धनत्रयोदशीमुळे याची खरेदी सध्या सुरु आहे. - दर्शन शहा, व्यापारी.