होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह
By निखिल म्हात्रे | Published: March 17, 2024 01:29 PM2024-03-17T13:29:28+5:302024-03-17T13:29:48+5:30
आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे.
अलिबाग - मोबाईल, इंटरनेटच्या जगात वावरणाऱ्या पिढीला आजही मातीतील खेळ आवडत आहे. होळी सणानिमित्ताने खेळला जाणारा पारंपरिक आट्यापाट्या खेळ अनेक दिवसांपासून गावे, वाड्यांमध्ये सायंकाळच्या वेळेला खेळला जात आहेत. त्यामुळे आट्यापाट्या खेळ आजही तग धरून असल्याचे चित्र आहे.
आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही आट्यापाट्या हा पारंपरिक खेळ खेळला जात आहे. या खेळातून एक वेगळा आनंद मिळत असल्याने मोबाईलमध्ये रमणारी तरुणाई या खेळामध्ये मग्न असल्याचे चित्र आहे.
खेळापासून अनभिज्ञ -
आट्यापाट्या हा खेळ खेळाडूंच्या प्रमाणात चौकटी आखून त्यात विरुद्ध संघाच्या खेळाडूसाठी एक मर्यादित रेषांतील जागा ठरवून दिला जातो. त्यानंतर डाव सुरू होतो. होळीच्या आठ दिवसआधी लहान होळ्या उभारल्या जातात. त्या ठिकाणी सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन आट्यापाट्या खेळ खेळतात. क्रिकेट, कबड्डी आदी मैदानी खेळांची वेगवेगळ्या प्रभावी माध्यमांतून जाहिरातबाजी होत असल्याने ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. त्यामुळे आट्यापाट्या हे खेळ मागे पडू लागले आहेत. आजच्या पिढीपर्यंत आट्यापाट्या हा खेळ पोहचला नसल्याने याची काहींना माहिती नाही.
प्रत्येक सणांच्या कालावधीत वेगवेगळे खेळ खेळण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. गावे, गल्लीतील या मैदानी खेळांतून एक वेगळा आनंद मिळतो. शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढीला या खेळांतून चालना मिळत असताना, चपळताही निर्माण होते.
- यतीराज पाटील, क्रीडा शिक्षक
होळीच्या निमित्ताने आट्यापाट्या हा खेळ आम्ही गावातील सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन खेळत होतो. त्यामुळे एक वेगळा उत्साह जाणवत होता. या खेळामुळे अंगात चपळाई निर्माण होत होती. काही गावे, वाड्यामध्ये आट्यापाट्या खेळ खेळला जात आहे. याचा आनंद आहे. कारण हा खेळ आजही तग धरून असल्याचे समाधान आहे.
- निकेत मढवी.