उरणमध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 07:06 PM2023-12-30T19:06:29+5:302023-12-30T19:06:40+5:30
उरण परिसरातील विविध ठिकाणच्या गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मधुकर ठाकूर
उरण: उरण परिसरातील विविध ठिकाणच्या गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. उरण परिसरातील उरण शहर,नागाव,बोकडवीरा, सोनारी,केगाव,चिरनेर आदी ठिकठिकाणच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.महागणपतीच्या दर्शनासाठी थंडीची तमा न बाळगता पहाटेपासूनच, रांगा लावल्या होत्या. काही भाविकांनी पायी वारी करीत मंदिर गाठून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात भजनांचा सूर ऐकायला मिळाला. रायगड, नवी मुंबईसह हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
विशेषता छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली होती. शोभिवंत वस्तूंची दुकाने, हॉटेल,नारळ, हार, फुले व पापड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. श्री महागणपती मंदिर परिसरात फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक आदिवासी व आगरी समाजाच्या महिला विक्रेत्या विक्री करताना दिसून आल्या. त्यामुळे श्री महागणपती मंदिर परिसरात मोठी वर्दळ दिसून आली. विशेषता मंदिरात येणारे भाविक येथून आवर्जून हा रानमेवा खरेदी करताना दिसत होते. भाविकांच्या सोयीसाठी श्री गणपती देवस्थान तर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.