मधुकर ठाकूर
उरण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतात प्रथमच १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजारोहण, संचलन व शहीदांना सलामी देण्याचा कार्यक्रमानंतर आता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताचे औचित्य साधून १९ जुन रोजी योगा दिनाच्या (२१ जून ) दोन दिवस आधी नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी पत्नीसह उरण येथील जलतरण तलावात १३ फूट पाण्याखाली २५-३० मिनिटे विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके करण्याचा संकल्प केला आहे.
यावर्षी योगदिनाचे ब्रीदवाक्य 'मानवतेसाठी योग' हे आहे. या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येत्या १९ जून रोजी माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी आणि योग प्रशिक्षिका पत्नी विदुला कुलकर्णी हे तेरा फूट पाण्याखाली योगाची प्रात्यक्षिके सादर करून नवा विक्रम करणार आहेत. उरणमध्ये श्री. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलामधील पोहण्याच्या तलावामध्ये ही प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. १३ फूट खोल पाण्याखाली ओंकार, सूर्यनमस्कार तसेच वेगवेगळ्या प्रकारची आसने असा हा कार्यक्रम आहे. यावर्षी योगदिनाचे ब्रीदवाक्य 'मानवतेसाठी योग' हे असून हा अतिशय महत्त्वाचा संदेश कुलकर्णी दांपत्य २५-३० मिनिटे पाण्याखाली योग करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
स्कुबा डायव्हिंगचे साहित्य वापरून पाण्याखाली केला जाणारा हा योग प्रात्यक्षिकांचा प्रयत्न संपूर्ण देशात बहुधा पहिल्यांदाच होत असण्याची शक्यता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. योग प्रात्यक्षिकांचा सराव सुरू असून आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या आधी दोन दिवस म्हणजे १९ जूनला दुपारी १२ ते दोन वाजण्याच्या दरम्यान हा "अंडर वॉटर योगा " करण्यात येणार आहे. रवी कुलकर्णी यांनी यापूर्वी पाण्याखाली लग्न सोहळा, तसेच गेल्याच वर्षी पाण्यासाठी ध्वजवंदन आणि परेड असे आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत.