नागोठण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:26 AM2019-09-05T02:26:32+5:302019-09-05T02:26:58+5:30

जनजीवन विस्कळीत : चिकणी गावच्या हद्दीत अडकलेले दाम्पत्य बचावले

Once again the floodgates | नागोठण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती

नागोठण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती

Next

नागोठणे : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात बुधवारी दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामपंचायत तसेच पोलीस आणि महसूल यंत्रणा पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून असून पूराच्या पाण्याने नागोठणे बाजारपेठ तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता.

मंगळवारी सायंकाळपासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने अंबा नदीने मध्यरात्रीच्या दरम्यान पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने पहाटे एसटी बसस्थानक, शिवाजी चौक, कोळीवाडा भागात पुराचे पाणी चढण्यास प्रारंभ झाला होता. पावसाचा जोर कायमच राहिल्याने पुराचे पाणी आणखी वेगाने भरण्यास सुरुवात झाल्याने घर तसेच दुकानातील सामानाची हलवाहलवी करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. चिकणी गावच्या हद्दीत हॉटेल गुलमोहरमागे २०० मीटर पाण्यात भगवान जाधव (३०) आणि भारती भगवान जाधव (२०) दोन्ही रा. धोबेवाडी (पाच्छापूर) ता. सुधागड हे दाम्पत्य अडकले असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक ग्रामस्थ साई मोहन राठोड, लोकेश शिवा नायक, चिकणी यांनी पोहत जाऊन रबरी ट्यूबच्या सहाय्याने सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

कोळीवाड्यात अनेक घरांमध्ये गणपती विराजमान झाले असल्याने अनेकांची धावपळ उडाली. या भागात पाण्याची पातळी दहा फूट इतकी असल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्याने गणपतीची मूर्ती घरात ठेऊनच त्यांना घराबाहेर पडलावे लागले होते. तर, घराबाहेर पडण्यापूर्वी काहींनी पाण्यात उभे राहूनच आपल्या घरातील बाप्पांची आरती केली. तेथील सुभाष जामकर यांच्या मूर्तीला पुराचे पाणी लागल्याने त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार कविता जाधव यांनी दुपारी स्थानिक महसूल यंत्रणेसह पुराची पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके यांच्या पुढाकारातून नागोठणे ग्रामपंचायतीकडून मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळी पुराचे पाणी चढत असल्याचे कळल्यानंतर येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नितीश पाटील आणि महिला पोलीस प्रतीक्षा गायकवाड यांनी विशेष सहकार्य केल्याने शासकीय यंत्रणांना वेळीच उपाययोजना करण्यात यश मिळाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला होता. दरम्यान, हवामान खात्याच्या सूचनेनुसार मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच
डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे.

Web Title: Once again the floodgates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.