महाड : होळीनंतर पुढील पाच दिवस कोकणातील गावांमध्ये पालख्या काढण्यात येतात. यासाठी शुक्रवारी हजारो चाकरमानी कोकणातील त्यांच्या मूळगावी निघाले. त्यामुळे शुक्रवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच रांगा लागल्या होत्या. माणगाव आणि टेमपाले या दोन ठिकाणी तर तब्बल पाच किमी प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी चाकरमान्यांना लागत होता.
होळी दहन गुरुवारी रात्री करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी धुलिवंदन सण साजरा करून पुढील पाच दिवस कोकणातील प्रत्येक गावी संपूर्ण गावात गावदेवीची पालखी मिरवणूक निघणार आहे. आता सलग तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने मोठ्या संख्येने नागरिक या सणासाठी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर छोट्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.
माणगाव, टेमपाले येथे वाहतूक कोंडी झाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्र, महाड आणि टेमपाले येथील काही मुस्लिम तरुणांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
वाहने जोड रस्ता मार्गाने
महामार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी माणगाव आणि टेमपाले या दोन ठिकाणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. शुक्रवारी दिवसभर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ होती. माणगाव येथे पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी एक ते दीड तास लागत होता. याच भागातील टेमपाले या गाव हद्दीत महामार्गाचे काम अर्धवट असल्याने वाहने जोड रस्ता मार्गे जात होती. त्यामुळे एक किमीच्या प्रवासाला खूप वेळ लागत होता.
पाहणी केली, पण...
माणगाव बाहेरून नवीन मार्ग संपादित केला असला तरी काम अर्धवट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह आदी मंत्र्यांनी याची पाहणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाने नेहमी प्रवास करतो. यावेळी महाड-मुंबई यादरम्यान माणगाव येथे वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे- इक्बाल म्हेस्कर, वाहनचालक.