नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमधील मोहिली आरोग्य उपकेंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी महिलेची केंद्राच्या बाहेर दीड तास तडफडून प्रसूती झाली. सुदैवाने आई व बाळ सुखरूप आहे. मात्र, या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेणुका वाघमारे यांना शनिवारी सायंकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्या केंद्राकडे आल्या. त्यांच्यासोबतच्या महिलेने अंगणवाडी सेविका कामिनी सोनावणे यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी डॉक्टर प्रीती करवंदे यांना न कळवता रुग्णसेविका अपर्णा अहिरकर यांना सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. करवंदे असतानाही सोनावणे यांनी अहिरकर व रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक नितीन देशमुख दारूच्या नशेत होता. त्यामुळे दीड तास रेणुका या प्रसूती वेदनांनी केंद्राबाहेर तडफडत होत्या. शेवटी असह्य झाल्याने त्या कोलमडून पडल्या. त्यानंतर त्या महिलेच्या एका नातेवाइकाने ग्रामपंचायत सदस्य हेमंत घरत यांना फोनद्वारे कळविले. त्यांनी डॉ. करवंदे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉ. करवंदे तेथे आल्या. मात्र, तोपर्यंत त्या महिलेची प्रसूती केंद्राच्या बाहेरच ग्रामस्थ महिलांनी केली. त्यामुळे त्या व बाळ थोडक्यात वाचले. त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले.
मोहिली आरोग्य उपकेंद्राचा बेधुंद कारभारमोहिली आरोग्य उपकेंद्राची इमारत धोकादायक झाली आहे. स्टाफ नर्स नसल्याने सर्व जबाबदारी डॉ. प्रीती करवंदे यांच्यावर आहे. रुग्णवाहिकेचा चालक सतत दारूच्या नशेत असतो. जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार लोकप्रतिनिधी असणार आहेत. आता तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी व मनुष्यबळ पुरवावे, अशी मागणी कष्टकरी संघटनेचे लक्ष्मण पालकर यांनी केली आहे.उपकेंद्रात स्टाफ कमी आहे. त्यात दिवसरात्र मलाच ड्यूटी करावी लागत आहे. याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. मात्र, कोणीच दखल घेत नाही. एक जूनपासून संध्याकाळी उपकेंद्र बंद ठेवावे लागत आहे. जर मला वेळीच हा प्रकार कळला असता तर ही वेळ आली नसती. - डॉ. प्रीती करवंदे, वैद्यकीय अधिकारीसंबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. लवकरच नर्सची भरती करण्यात येईल. शासनाने शिपाई पद रद्द केले असल्याने ते भरता येणार नाही. - अशोक कटारे, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती