ोहा : राज्यातील आदिवासी आश्रमशाळेत ५०२ क्रीडा शिक्षकांच्या नेमणुका कंत्राटी पद्धतीने करण्यात आल्या. मात्र आता राज्यातील १५०० क्रीडा, कला आणि संगणक शिक्षक वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. या कंत्राटी शिक्षकांना शासनाने लॉकडाऊन काळ संपूनही अद्याप नियुक्ती आदेश व मानधन अदा केलेले नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभाग खात्यातील या १५०० शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ५०२ शासकीय आश्रमशाळा आहेत. राज्यात ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर असे चार विभाग आहेत. या प्रत्येक विभागात सहा ते आठ प्रकल्प आहेत. अशा प्रत्येक प्रकल्पात १२० ते १५० शासकीय शाळा आहेत. प्रत्येक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकीकडे राज्यातील मराठी शाळा बंद पडत असताना आश्रमशाळेत मात्र विद्यार्थीसंख्या वाढत आहे. मात्र या शाळेतील क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांच्या नियुक्त्या अद्याप करण्यात न आल्याने या शाळेतील विद्यार्थी एकाकी पडले असतानाच शिक्षकांसह त्यांचे कुटुंबीयही आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.
आदिवासी विकास विभागात २०१८ साली बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासन निर्णयानुसार राज्यात आदिवासी विकास विभागातील क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. पहिल्या वर्षी क्रीडा शिक्षकांची भरती केली. त्यानंतर कला आणि संगणक शिक्षकांची भरती शासनाने २०२०च्या सुरुवातीला केली. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता या कलागुण अवगत शिक्षकांच्या नियुक्त्या आदिवासी विभागाने का थांबवल्या, असा सवाल संतप्त शिक्षकांतून होत आहे.