वैभव गायकर
पनवेल - तळोजातील वाहतूक पोलीस अतुल किसन गागरे यांच्या अपघाती मृत्यूस जबाबदार असलेल्या कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. बाबुलाल रामचंद्र मौर्या (29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुळचा उत्तर प्रदेश येथील हा कंटेनर चालक सध्या उरणमधील जासई येथे राहत आहे.
बुधवारी (5 सप्टेंबर) पहाटे आयजीपीएल नाक्यापासून काही अंतरावर एमआयडीसी बायपास कल्याण मार्गावरील नितळस गावालगतच्या अमित वर्कशॉपजवळ अतुल गागरे वाहतूक कोंडी मोकळी करत होते. ऑनड्युटी असताना एका वाहनाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्या दरम्यान पहाटेच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेऊन वाहन चालक गाडीसह पसार झाला होता.
अपघातानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा, उरण व न्हावा शेवा पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट-3 व तळोजा वाहतुक शाखा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. अपघात घडलेल्या घटनास्थळाचे आजुबाजूचे तसेच कल्याण ते नावडे फाटा दरम्यान रोड कव्हर करणाऱ्या विविध आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून तसेच अपघाताच्या दरम्यान या ठिकाणावरून गेलेल्या इतर वाहन चालकांकडे चौकशी केली असता एका पांढऱ्या रंगाच्या केबीनचा व त्यावर MOL आणि K LINE असे इंग्रजीत लिहीलेले दोन कंटेनर असलेल्या ट्रेलरने अपघात केल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित ट्रेलरच्या तपासासाठी न्हावा शेवा, उरण, द्रोणागिरी परिसरातील कंटेनर यार्ड, वजन काटे, पेट्रोलपंप, येथील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. तपासात संशयित कंटेनर द्रोणागिरी येथील सम्राट वजन काटा येथून वजन करून गेले असल्याचे आढळले. त्यावरून सदर ट्रेलरचा क्रमांक एम.एच.04/सी.यु./9134 असा असल्याचे आणि हा ट्रेलर जासई येथील ओम श्री गणेश कंटेनर सर्व्हिस या ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे समजले. आरोपी चालक हा अपघातग्रस्त वाहन घेऊन चाळीसगाव, जळगाव येथे गेल्याचे माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मदतीने सदर ट्रेलर व चालकास ताब्यात घेऊन तळोजा पोलीस स्टेशनमध्ये आणले. तपासात या आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. संबंधित गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक बिरप्पा लातुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे, अमोल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अनिल सुरवते व पथकातील इतर पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.