लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात ८ कोटी १९ लाख ५९ हजार ७९८ रुपये ८९ पैसे एकूण संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या शपथ पत्रामध्ये सादर केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा आता संपत्तीत १ कोटी ४९ हजार ४२० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
त्यांच्यावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपये इतके कर्ज आहे. गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. गीते हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. सोमवारी गिते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज करताना गिते यांनी शपथपत्रात सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी ४४ लाख ६६ हजार ४८७ होती.
२५ लाखांचे बाँडशपथपत्रात एफडी, टर्म खात्यात १ कोटी ७८ लाख ५५ हजार १९५ रुपये ८९ पैसे असून, २५ लाख १० हजारांचे बाँड, अशी २ कोटी ३४ लाख २० हजार ८५२ रुपये ८९ पैसे स्थावर मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता ५ कोटी ७३ लाख ४९ हजार ७९८ रुपये ८९ पैसे असल्याचे शपथ पत्रात दिले आहे. गीते यांच्या नावावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपये इतके कर्ज आहे. सोमवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तीन गीते मैदानातरायगड लोकसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहतात. २०१९च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे नामसाधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले होते. आता गीतेंचे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून अजूनही नामसाधर्म्य असलेले उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे.
नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची दखल घेण्यासारखे काही नाही. प्रचाराची वैचारिक पातळी खालावली आहे. त्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष असून त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा आहे. आमची इंडिया आघाडी मजबूत असून त्यांच्या भूमिकेवर चर्चा करणे आवश्यक नाही. - अनंत गीते, उमेदवार, उद्धवसेना