वीर वाजेकर कॉलेजमध्ये एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 04:30 PM2023-08-25T16:30:29+5:302023-08-25T16:31:21+5:30
उरण येथील वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मधुकर ठाकूर
उरण येथील वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ आमोद ठक्कर यांनी उरणच्या परिसरातील कौशल्य आधारित शिक्षणाची गरज व त्याची आवश्यकता तसेच उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधी आणि कार्यशाळेच्या उद्देशही माहिती करून दिली.
कार्यक्रमात पाहुणे म्हणुन जिल्हा उद्योग केंद्र इन्स्पेक्टर मोहन पालकर यांनी त्यांच्या मार्फत उद्योजकता प्रशिक्षण सुविधांची माहिती दिली. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगाला लागणारे भांडवल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममधून दिले जाणारे उत्पादन व सेवा सुविधांसाठी मिळणारे कर्ज व त्याचे अनुदान त्यात महिला व श्रेणीतील व्यक्तींना विशेष अनुदानाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी विविध प्रकारचे कोर्स राबविण्यात येतात. त्यांचीही माहिती दिली. हे कोर्स पूर्ण केल्यावर शासकीय सर्टिफिकेट व स्टायपेंडही दिली जाते. तसेच कौशल्य आधारित स्वयंरोजगारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे यासाठी बँक आपणास पंतप्रधान योजना व मुख्यमंत्री योजना या मार्फत सबसिडीचे कर्ज अत्यल्प व्याजदराने उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र इन्स्पेक्टर मोहन पालकर यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पी. जी. पवार यांनी महाविद्यालयात कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची तसेच आपल्या परिसरातील उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधीची माहिती करून दिली. यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणार्या सर्व सुविधा महाविद्यालयातर्फे उपलब्ध केल्या जातील. प्रत्यक्षात स्वयंरोजगाराच्या छोट्या मोठ्या संधी हेरून धाडस करावे लागेल. आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करुन शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये प्रशिक्षण व निधि उपलब्ध करून दिला जातो. त्याचा फायदा घ्यावा. तसेच आपल्या परिसरात मत्स्य व्यवसायमध्ये मत्स्य शेती, मत्स्य प्रक्रियामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करावेत व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे पवार यांनी आवाहन केले. या आयोजित कार्यशाळेत प्राणिशास्त्र माजी विद्यार्थी आवेश पाटील यांनी मत्स्य प्रक्रिया व निखिल तवटे आयटी माजी विद्यार्थी यांनी हॉटेल व्यवसायाबाबत मार्गदर्शन घेतले.