पाले खुर्द शाळेत एक दिवस दप्तराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:46 AM2020-03-16T01:46:29+5:302020-03-16T01:46:44+5:30
पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ई-लर्निंग त्याचबरोबर वाचन कट्टा आणि एक दिवस दप्तरविरहित शाळा भरते.
कळंबोली : एकीकडे इंग्रजी माध्यमांकडे रोख वाढला असताना दुसरीकडे रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पाच पटीने वाढत आहे. पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ई-लर्निंग त्याचबरोबर वाचन कट्टा आणि एक दिवस दप्तरविरहित शाळा भरते. गेल्या ६४ वर्षांपासून ज्ञानाचे मंदिर या ठिकाणी सुरू आहे. येथे अनेक विद्यार्थी शाळा शिकून मोठे झाले आहेत.
पनवेल हे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. येथे अनेक खासगी शिक्षण संस्थांनी आपले जाळे पसरले आहे. इंग्रजी माध्यमांचे फॅड वाढले आहे. आपला मुलगा खासगी शिक्षण संस्थेमध्ये शिकावा याकरता पालकांचा आटापिटा सुरू आहे. केजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी थेट मंत्रालयातून फिल्डिंग लावली जात आहे. एकंदरीतच इंग्रजी माध्यमांमुळे मराठी माध्यम तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरत चालली आहे. मात्र याला पाले खुर्द शाळा अपवाद असल्याचे दिसून येत आहे. येथे पाचपटीने विद्यार्थीसंख्या वाढली आहे. बाजूला तीन खासगी शिक्षण संस्थांनी बस्तान बांधले आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढतच आहे. याचे कारण म्हणजे या ठिकाणी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. सीएसआर फंडातून शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. त्याचबरोबर येथे चांगल्या दर्जाची सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे दिले जातात.
याकरता शाळेमध्ये एलईडीचा समावेश आहे. याचबरोबर बाल आनंद मेळावा, विज्ञान जत्रा, बाल बचत मेळावा, सहल, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम शाळेत राबवले जातात. दररोज पोषण आहारही दिला जातो. पहिली ते पाचवी अशी या ठिकाणी शाळा आहे. गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सुप्रिया पाटील, नगरसेविका अरुणा किरण दाबणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय दाभणे, उपाध्यक्ष शशिकांत गोंधळी शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी याकरता परिश्रम घेतले आहेत.
झाडाखाली वाचन कट्टा
पाले खुर्द जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचन कट्टा बांधण्यात आला आहे. बदामाच्या झाडाखाली ५० विद्यार्थी बसतील असा हा कट्टा उभारण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील
तसेच शाळेतील ग्रंथालयांमध्ये असलेली पुस्तके या ठिकाणी घेऊन येऊन विद्यार्थी वाचन करू
शकतील.
एक दिवस दप्तराविना
या ठिकाणी शनिवारी विनादप्तर शाळा भरते. या दिवशी विद्यार्थ्यांनी दप्तर आणायचे नाही, असा दंडक आहे. त्यांना स्मार्ट डिजिटल बोर्डवर शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर या शाळेत योगा डेसुद्धा साजरा केला जातो.
शाळेमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याकरता विविध उपक्रम राबवले. अधिकारी स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य मिळाले.
- प्रकाश सुतार, मुख्याध्यापक
रायगड जि. प. शाळा या मागे नाहीत, हे पाले खुर्द जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करून दाखवलो. शिक्षक व ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर करू शकलो.
- विजय दाभणे, अध्यक्ष, शाळा समिती