आविष्कार देसाई
रायगड : सरकारने अंगणवाडी सेविकांची दिवाळी गाेड करण्याचा निर्णय घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. एक काेटी सात लाख ६० हजार रुपये जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. तब्बल पाच हजार ३११ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दाेन हजार रुपये आता जमा हाेणार आहेत.
ग्रामीण स्तरावर सरकारच्या याेजना अगदी खाेलवर रुजविण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात. अगदी कमी मानधनावर ते आपले कर्तव्य पार पाडत आहे. पल्स पाेलिओ, तापाचे रुग्ण शाेधणे, नवजात बालकांना लस देणे, गराेदर माता यांना वेळेवर औषध पुरवणे, पाेषण आहार, त्याचप्रमाणे आताच्या काेराेना महामारीच्या कालावधीतही त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. दिवाळी सण म्हटले की आनंद, उत्साह, खमंग फराळ अशा सर्व गाेष्टी अंतर्भूत हाेतात. या कालावधीत सर्वच ठिकाणी आनंदाचे वातावरण असते. दिवाळी सणाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात झाेकून देऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचीही दिवाळी गाेड व्हावी असे सरकारला वाटले हाेते. त्यानुसार सरकारने त्यांच्यासाठी प्रत्येकी दाेन हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तब्बल एक काेटी सात लाख ६० हजार रुपये रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केले आहेत.
दाेन दिवसांत खात्यावर जमा हाेणार रक्कमअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गाेड करण्यासाठी सरकारने एक काेटी सात लाख ६० हजार रुपये दिले आहेत. सध्या जिल्हा काेषागार विभागात रक्कम आहे. दाेनच दिवसांमध्ये ती रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा हाेणार आहे. जिल्ह्यातील पाच हजार ३११ अंगणावाडी सेविका - मदतनीस यांना त्याचा लाभ हाेणार आहे. पुढील दाेन दिवसांमध्येच त्यांना प्रत्येकी दाेन हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे उशिरा का हाेईना त्यांना दाेन हजार रुपये प्राप्त हाेणार आहेत.
ग्रामीण भागामध्ये अंगणावाडी सेविका, मदतनीस काम करतात. त्यांचीही दिवाळी गाेड करावी हा सरकारचा उद्देश हाेता. रक्कम प्राप्त झाली आहे. पुढील दाेन दिवसांतच ती संबंधितांच्या खात्यावर जमा हाेणार आहे.- डाॅ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड
सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. ग्रामीण स्तरावर आम्ही सरकारची ध्येय, धाेरणे राबवत असताे. दिवाळीच्या आधी लाभ झाला असता तर अधिक चांगले झाले असते. सरकारचे खूप खूप धन्यवाद.- गीतांजली वरसाेलकर, अंगणवाडी सेविका