गणेश प्रभाळे
दिघी : मागील काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील एसटी प्रवास कटकटीचा होऊन खिशाला चांगलीच चाट देणारा ठरत आहे. दिवेआगर येथून सकाळी मुंबईला जाणारी एसटी बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत असताना त्यामध्ये सायंकाळी सुटणारी श्रीवर्धन-मुंबईदेखील बंद झाल्याने मुंबईहून गावाकडे होळी उत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे ग्रामीण भागाची लाइफलाइन म्हणून एसटीचा आपण मोठ्या अभिमानाने उल्लेख करीत असलो तरी एसटीचा प्रवास म्हणजे अनंत अडचणींचा सामना होय. याचा प्रत्यय सध्या श्रीवर्धन तालुक्यात येत आहे. श्रीवर्धन आगारातून मुंबई, नालासोपारा, भांडुप, तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बस जातात. मात्र, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून शिमगोत्सवासाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील धनगरमलई मार्गावरील एकूण बारा गाव-वाड्यांकडे जाण्यासाठी गाडी नाही. शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.
दिवेआगर-मुंबई व श्रीवर्धन येथून सुटणारी दांडगुरीहून धनगरमलईमार्गे मुंबईला जाणारी गाडी होळी उत्सव सुरू झाला तरी अद्याप सुरू झाली नाही. मुंबईहून निघणाऱ्या चाकरमान्यांना गाडी बंद असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय गावाकडे येण्यासाठी अर्धवट प्रवास करून लोकल एसटीदेखील उशिराने येत आहेत. मुंबईला जाणाऱ्या बस बंद केल्या जातात. होळी उत्सवातदेखील बस रद्द केल्याची कोणतीच पूर्वकल्पना प्रवाशांना नसल्यामुळे सर्व सामानासह बस स्टॉपवर आलेल्या प्रवाशांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करवा लागतो.
कित्येक वर्षे मुंबई गाडीने आम्ही प्रवास करीत आहोत. मुंबई गाडी बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी उलट-सुलट प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून गाडी नसल्याने म्हसळा, माणगाव येथे जाऊन एसटी पकडावी लागते. मात्र, गाडीमध्ये गर्दी होत असल्याने पर्यायी खाजगी वाहनांचा आधार घेत मुंबई प्रवास करणे भाग पडत आहे. - सुनील रिकामे, बोर्लीपंचतन, मुंबई स्थायिक
या मार्गावर १२ गावांना मुंबई एसटी नाहीश्रीवर्धन आगारातून धनगरमलई मार्गावरून मुंबईला जाणाऱ्या दोन गाड्या बंद केल्या आहेत. या मार्गावर वावेपंचतनपासून बोर्ला, देवखोल, नागलोली, सालविंडे या चार गावांना मिळून आजूबाजूला आठ वाड्या आहेत. येथील नागरिक कामानिमित्त मुंबईस्थित आहेत. मात्र, येथील प्रवाशांना मुंबईहून गावी येण्यासाठी एसटीच नाही. श्रीवर्धन तालुक्यातील काही परिसर असा आहे की, एस. टी.ची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही, अशांची फारच गैरसोय होते. त्यामुळे दिवेआगर येथून सकाळी ७ ला सुटणारी मुंबई एसटी व श्रीवर्धन आगारातून सायंकाळी ५ वाजताची मुंबई या दोन साध्या गाड्यांची होळी उत्सवात सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
कोरोनामुळे मुंबई एसटी बस बंद करण्यात आली होती. नंतर प्रवाशांच्या मागणीनुसार त्या-त्या विभागातील एसटी सुरू करण्यात आली. मागणी होत असेल तर बंद केलेल्या बस पुन्हा सुरू केल्या जातील. - तेजस गायकवाड, श्रीवर्धन आगार प्रमुख