महाडनजीक अपघातात एक ठार, ३५ प्रवासी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:19 AM2017-11-10T01:19:37+5:302017-11-10T01:19:43+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.
महाड : मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.
एमएच ०६ बीडी ७८२ या क्रमांकाचा टेम्पो पोलादपूरकडून महाडकडे येत असताना, चालक नाविद अब्बास वास्ता (रा. मेटकर्णी, श्रीवर्धन) याने टेम्पो नव्या पुलावरून नेण्याऐवजी जुन्या पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी या पुलावरून महाडकडून गुहागरकडे जात असलेली एमएच २० बीएल ८०३२ या क्र मांकाची एसटी आली. त्यामुळे गोंधळलेल्या नाविद अब्बास वास्ता याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो या बसवर जाऊन धडकला. या अपघातात नाविद वास्ता याचा मृत्यू झाला, तर बसचालक आणि वाहकांसह बसमधील ३३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना दुसºया बसने गुहागरकडे रवाना करण्यात आले.
या प्रकरणी बसचालक मुख्तार वजीर सय्यद (गुहागर आगार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.