माणगाव तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू; दोघा जखमींमध्ये १० वर्षांच्या मुलाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:26 AM2021-11-25T11:26:26+5:302021-11-25T11:26:55+5:30
या स्फोटात सत्यम याला गंभीर दुखापत होऊन संदेशची पत्नी मजिनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता आणण्यात आले.
रायगड: माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, स्फोटामध्ये एक १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर त्याची आई किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी २५ हातबॉम्ब हस्तगत केले आहेत.
या भीषण स्फोटात संदेश आदिवासी चौहान (वय ४५) याचा जागीच मृत्यू झाला. संदेशची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय ४०) व मुलगा सत्यम संदेश चौहान (वय १०) (सर्व रा. बिराहली, ता. रिथी, जि. कठनी, मध्य प्रदेश) हे जखमी झाले आहेत. डुकराच्या शिकारीसाठी हातबॉम्बचा वापर करण्यात येतो. चौहान कुटुंब याच कारणासाठी बॉम्बचा वापर करत असल्याची माहिती पुढे आली आहे. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावाच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ ही घटना घडली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संदेश हा त्याची पत्नी मजिनाबाई, मुलगा सत्यम हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदीशेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहात होते. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हातबॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये संदेश यांच्या हाताला आणि शरिराला गंभीर जखमा झाल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
जखमींवर पनवेलमध्ये उपचार
या स्फोटात सत्यम याला गंभीर दुखापत होऊन संदेशची पत्नी मजिनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्याला अधिक औषधोपचारांसाठी एमजीएम रुग्णालय येथे हलविले.
एका झाडावर लपवलेले २५ गावठी हातबाॅम्ब सापडले. हे लोक मध्य प्रदेशातील पारधी समाजाचे आहेत. बॉम्ब घटनास्थळीच तयार केले असावेत आणि ते हाताळताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- अतुल झेंडे, अपर जिल्हा
पोलीस अधीक्षक