पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक लोहारमाळ गावच्या हद्दीत भरधाव वेगाने मुंबई दिशेने जाणारी खासगी बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये एक ठार, तीन गंभीर आणि १९ प्रवासी जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री २.४५ वाजताच्या सुमारास घडली.खासगी बसचालक केशव कावळे (२९, रा. खानोली तळेकरवाडी, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) हा बस घेऊन गोवा ते मुंबई असा प्रवास करीत असताना पोलादपूरनजीक लोहारमाळ गावच्या हद्दीत त्याचा गाडीवरील ताबा सुटला. ही बस झाडावर आदळून रस्त्याकडेला उलटली. यामुळे बसमधून प्रवास करणारे सुनील जैस्वाल (३४, रा. कुलारगाव मालाड, मुंबई) हे जागीच ठार झाले, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविले आहे. या घटनेची माहिती मिळताच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे आणि अन्य पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अंधार असल्याने बचाव कार्य करताना पो.ना.दीपक जाधव यांच्या हाताला बसची काच लागून जाधव जखमी झाले आहेत. यातील मृत सुनील जैस्वाल यांचे शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघातातीलजखमी प्रवासीशीला बांधीवडेकर (५१, रा. वैभववाडी), विकास दळीप (रा. दिल्ली), गीतेश बांधीवडेकर (२५, रा. राजापूर), अजित इनामदार (२८, रा. डोंबिवली), पुरुषोत्तम शेठ (४२, रा. भांडुप, मुंबई), पलक सुरेंद्रसिंग (२९, रा.अंधेरी, मुंबई), जगदीश सिंग (२९, रा. राजस्थान) विकास काळे (४०, रा. घाटकोपर), आशिष अशोक भुरे (३०, रा. खारघर) ओम गुरव (८, रा. सांताक्रुझ), अक्षय धागू (१८, रा. दिल्ली), अनय भुरे (३, रा. खारघर), अँथनी डिसोजा (३९, रा. सांताक्रुझ, मुंबर्ई), परेरा (२३, रा. गोवा), विकास प्रजापती (३०, रा. मुंबई), साफिक मुलिक (२७, रा. बांद्रा, मुंबई), शेख अब्दुल अली (३५, रा. बांद्रा), कृष्णा पडई (४१, रा. लांजा, जि. रत्नागिरी), श्रेया गुरव (४३, रा. मुंबई) असे १९ प्रवासी जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात येथील डॉक्टरांनी उपचार केले.या अपघातातील तीन गंभीर प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.
बस अपघातात एक ठार १९ जखमी, लोहारमाळ गाव हद्दीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:33 AM